मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । “लग्नाला येऊ नका. कोरोना व्हायरसचा संसर्ग होण्याची शक्यता असल्याने माझ्या मुलीच्या लग्नाला येऊ नका. आम्ही लग्न थोडक्यात करायचं ठरवलं आहे. रिसेप्शन रद्द केलंय. त्यामुळे तुम्ही तुमचं आरोग्य धोक्यात घालून प्रवास करून लग्नाला येऊ नका,” असं सांगायची वेळ आता एका वडिलांवर आली आहे.कोल्हापुरातील संजय शेलार यांच्या मुलीचं 18 मार्चला लग्न आहे.
बीबीसी मराठीशी बोलताना त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणतात, “वर आणि वधूकडून आतापर्यंत जवळपास 3 हजार पत्रिकांचं वाटप आम्ही केलं. सगळ्यांना आग्रहाने लग्नाला बोलवलं. पण गर्दी करु नका असं सरकारकडून सांगण्यात आल्याने आम्हीही सामाजिक भान राखत लग्न केवळ कुटुंबीयांच्या समोर करून बाकी सगळे कार्यक्रम रद्द केलेत.
लग्नकार्य ही कुठल्याही वधू-वरासाठी आयुष्यातली सगळ्यांत खास घटना असते. कोल्हापूरचे ऋतुजा आणि किरण हे सुद्धा आपल्या लग्नासाठी खूप उत्सुक होते. लग्न ठरल्यापासून लग्नाच्या दिवसाची प्रतीक्षा दोघंही करत होते. लग्नाच्या साड्या आणि दागिन्यांच्या खरेदीनंतर कधी एकदा तयार होतेय असं ऋतुजाला वाटत होतं. तसेच किरणही ऋतुजाच्या साडीला मॅच होईल असा सूट घेण्याची तयारी करत होता.
दुसरीकडे दोघांच्याही घरात दिवस-रात्र लग्नाचीच धामधूम. मंडप, मिठाई, आचारी, भटजी ठरवण्याची लगबग सुरु होती. ऋतुजा आणि किरणने पत्रिका कशी असेल हेही ठरवलं. पत्रिका छापूनही आल्या.दोघांच्याही कुटुंबीयांनी उत्साहात पाहूण्यांना आग्रहाचं निमंत्रण दिलं. ऋतुजा आणि किरणने व्हॉट्सअॅपवरही सगळ्यांना लग्नाचं निमंत्रण पाठवलं. लग्नाची बऱ्यापैकी सगळी तयारी झाली. पण या आनंदाच्या वातावरणात पुण्यात कोरोना व्हायरसचा रुग्ण आढळला. बघता बघता महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय.
सरकारकडून मॉल्स, थिएटर्स, शाळा, महाविद्यालयं सगळं 31 मार्चपर्यंत बंद करण्यात आलंय. गर्दीत जाऊ नका, शक्यतो घराबाहेर पडणं टाळा असं आवाहन सरकारकडून करण्यात आलंय. अशी बातमी येताच या परिस्थितीत लग्न समारंभ कसा करायचा? असा प्रश्न दोन्ही कुटुंबांना पडला. दोघांच्याही घरात काळजी वाढू लागली. तेव्हा लग्न थोडक्यात आटोपून रिसेप्शन आणि बाकी कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय दोघांच्याही कुटुंबियांनी घेतला.
ऋतुजाने बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले, “आमचा साखरपुडा 4 फेब्रुवारीला पार पडला. तेव्हापासून लग्नासाठी खासकरुन रिसेप्शनसाठी मी खूप उत्सुक होते. कारण लग्नात विधी तर होतात पण रिसेप्शनसाठी आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी खूपजण येतात. आता कुणीही येणार नाही याचं वाईट वाटतंय.”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज