मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांना दिलासा देणारा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेत आता कोरोना उपचाराचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या रुग्णांना कॅशलेस उपचाराची सुविधा मिळणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
या बाबत मिळालेली माहिती अशी की, एक एप्रिलपासून राज्यभरात या योजनेंतर्गत सुमारे 1000 रुग्णालयांचा समावेश होणार असल्याने त्यामध्ये कोरोनाबाधीत मोफत उपचार घेऊ शकतील. या महत्वपूर्ण निर्णयामुळे योजनेतील सहभागी रुग्णालयातील सुमारे 2000 व्हेंटीलेटर्स देखील उपलब्ध होणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
कोरोनाच्या नियंत्रणासाठी राज्य शासन करीत उपाययोजनांच्या माध्यमातून नागरिकांना दिलासा देण्याचे काम केले जात आहे. शुक्रवारी संध्याकाळी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आरोग्यमंत्री श्री. टोपे यांनी यामहत्वपूर्ण निणर्याबाबत दोघांशी चर्चा केली.
यासंदर्भात अधिक माहिती देतांना आरोग्यमंत्री म्हणाले, राज्यात सुरू असलेल्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून सामान्यांना अनेक दीर्घ व उपचाराचा खर्च न परवडणाऱ्या आजारांवर उपचार आणि शस्त्रक्रिया मोफत केल्या जातात. सध्या या योजनेत राज्यभरातील 492 खासगी रुग्णालये सहभागी असून येत्या एक एप्रिलपासून त्यामध्ये दुपटीने वाढ होऊन 1000 रुग्णालयांचा समावेश होईल.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज