मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । ऐन होळीच्या दिवशी सोमवारी (ता. नऊ) वडगाव (ता. सोनपेठ, जि. परभणी) येथील एका तरुणाने व्हाट्सॲवपवर देवाघारी गेलेल्या पत्नीला उद्देशून ‘मी तुला भेटायला येत आहे’ स्टेटस ठेवून आत्महत्या केली.
वडगाव स्टेशन (ता. सोनपेठ) येथील सार्थक संजय बचाटे (वय २४) याने सोमवारी (ता. नऊ) सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास गावशेजारील शेतात एका लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
अपघातात पत्नीचा झाला होता मृत्यू
गंगाखेड येथे आटोमोबाइल सर्व्हिसिंग सेंटर चालवणाऱ्या सार्थक बचाटे यांचा ता.११ फेब्रुवारी रोजी गंगाखेड परळी रोडवर अपघात झाला होता. त्या अपघातात त्यांची पत्नी चंदा यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर ते नैराश्यात होते. सोमवारी सकाळी त्यांनी आपल्या व्हाट्सॲवपच्या स्टेटसवर आपल्या पत्नीला उद्देशून ‘मी तुला भेटायला येत आहे’ तसेच आपल्या परिवारासह मित्रांनाही उद्देशून स्टेटस ठेवले होते. त्याच्या मित्रांनी व नातेवाइकांनी हे स्टेटस पाहिल्यानंतर त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता तो घराच्या पाठीमागील तांड्याजवळील एका शेतात झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. सार्थक हा वडगाव येथील पोस्टमन संजय बचाटे यांचा मुलगा होता. अतिशय मनमिळाऊ व सुस्वभावी असणारा सार्थक याने घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे वडगाव व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज