मंगळवेढा टाइम्स वृत्तसेवा । मानोरा तालुक्यातील वसंतनगर पोहरादेवी येथील 35 वर्षीय घटस्फोटीत महिलेचे लग्न दुसऱ्या ठिकाणी जुळवून देतो असे आमिष दाखवून महिलेला पाहुणी म्हणून सोबत नेले. परंतु अनेक दिवसांपासून पीडित महिलेचा पत्ता लागत नसल्यामुळे शनिवारी (ता.14) मानोरा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. याप्रकरणी दोन आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला.
पोलिस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार फिर्यादीने तक्रारीत म्हटले की, माझ्या मुलीचे सन 2004 रोजी लग्न झाले. परंतु मुलीचे तिच्या नवऱ्यासोबत पटत नव्हते. तेव्हापासून माझ्याच घरी होती. 15 फेब्रुवारी 2020 रोजी नातेवाईक असल्याकारणाने पाहुणी म्हणून नेले व तिचे लग्न दुसऱ्या ठिकाणी जुळवून देतो असे आमिष दाखवून आरोपींनी तिला सोबत नेले.
अनेक वेळा फोनद्वारे माझ्या मुलीसोबत बोलायचे होते. परंतु आरोपी टाळाटाळ करीत होते.संशय आल्यावरून आरोपींच्या घरी गेलो असता ती मिळून आली नाही. नातेवाईकांकडे शोधाशोध केली असता तिकडेही नसल्याकारणामुळे आरोपी प्रेमसिंग नरसिंग राठोड आणि विरू प्रेमसिंग राठोड यांनी बेपत्ता केल्याची फिर्याद मानोरा पोलिस स्टेशनला देण्यात आली. याप्रकरणी आरोपी प्रेमसिंग नरसिंग राठोड व विरू प्रेमसिंग राठोड (रा. चिखलदारा जि. अमरावती) यांचे विरूद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास मानोरा पोलिस करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज