मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । सांगली येथील जुना धामणी रस्त्यावर पावणे सहा लाखांची घरफोडी करून पलायन करणाऱ्या दोघांचा फिल्मी स्टाईलने पोलिस आणि नागरिकांनी पाठलाग केला. दोघांनाही पकडले असून त्यातील एकास अंकलीतील कृष्णा नदीतून ताब्यात घेतले आहे. पहाटे पाचच्या सुमारास हा थरार सांगलीत सुरू होता.
दरम्यान, दोघांनाही विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे. मेहरसिंग रामसिंग गुदंड (वय 25) व करण मनोदर भवर (24, रा. खणी अंबा, ता. कुकशी, जि. घार, मध्यप्रदेश) अशी त्या दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून चोरलेला मुद्देमाल पोलिसांनी जप्त करण्यात आले. प्रदीप गणपतराव चव्हाण (वय 59) यांनी फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी प्रदीप चव्हाण हे जुना धामणी रस्त्यावरील इरसेड वनजवळील सिद्धिवल्लभ कृपा अपार्टमेंटमध्ये राहतात .
दरम्यान, अपार्टमेंटमधील अभिजीत जाधव यांना चव्हाण यांच्या घरात चोरी झाल्याचे समजले. पहाटे पाचच्या सुमारास त्यांनी तातडीने परिसरातील लोकांना गोळा केले. लोक गोळा झाल्याचे समजताच चोरट्यांनी बाल्कनीतून उडी मारून पळ काढला. धामणीच्या दिशेने दोघेही पळू लागले. याचवेळी विश्रामबाग पोलिसांनाही कळविण्यात आले. पोलिसांचे पथक आणि भागातील नागरिकांनी दोघांचा पाठलाग केला. त्यातील करण भवर याला लोकांनी ताब्यात घेतली आणि पोलिसांच्या हवाली केली. त्याचवेळी मेहरसिंग गुंदड याने अंकली (ता. मिरज) येथील कृष्णा नदीत उडी घेतली. नदीच्या दोन्ही बाजूला पोलिस आणि नागरिक उभे होते. तब्बल दीड तासानंतर त्यालाही ताब्यात घेण्यात आले. फिल्मी स्टाईलने पाठलाग करत पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले. पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे व त्यांचे पथक, एलसीबीचे सागर लवटे, बिरोबा नरळे, अमित परटी, सुरेश पाटील यांचा या कारवाईत सहभाग होता.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज