मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । कोरोनामुळे मृत पावलेल्यांची संख्या ४ वर पोहोचल्यानंतर आता मोदी सरकारनं महत्त्वाची पावलं उचलण्यास सुरुवात केलीय. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्रानं आज सहा मोठे निर्णय घेतले. कोरोनामुळे आज पंजाबमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीचं वय ७२ वर्ष इतकं आहे. देशात आतापर्यंत कोरोनामुळे मृत पावलेल्या व्यक्तींचं वयोमान ६० पेक्षा अधिक आहे. या पार्श्वभूमीवर ६५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या व्यक्तींनी घराबाहेर पडू नये, अशा सूचना केंद्राकडून देण्यात आल्या आहेत. याशिवाय विमान सेवेवरही कठोर निर्बंध लादण्यात आले आहेत.
कोरोनामुळे मृत पावलेल्या व्यक्तींचं वय ६० हून अधिक आहे. त्यामुळेच ६५ पेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींनी घराबाहेर पडू नये, असे आदेश केंद्रानं दिले आहेत.याशिवाय १० वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांनीदेखील घरीच राहावं, अशा सूचना केंद्राकडून देण्यात आल्या आहेत. लहान मुलांची आणि ज्येष्ठांची रोगप्रतिकार क्षमता कमी असल्यानं हा निर्णय घेण्यात आलाय. रेल्वे आणि विमान प्रवासादरम्यान मिळणाऱ्या सर्व सवलती रद् करण्यात आल्या आहेत. मात्र विद्यार्थी, रुग्ण आणि दिव्यांगांना यामधून वगळण्यात आलंय.
लोकांनी प्रवास टाळावा यासाठीही केंद्रानं महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. राज्यांनी खासगी क्षेत्रातल्या सर्व कंपन्यांना त्यांची कार्यालयं बंद ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. राज्य सरकारांनी सर्व खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम होम करण्याचे आदेश दिले असल्याचं केंद्रानं म्हटलंय. मात्र यामधून आपत्कालीन सेवांना वगळण्यात आलंय. सरकारी कार्यालयांमधील गर्दी टाळण्यासाठी द्वितीय आणि तृतीय श्रेणीतल्या सर्व कर्मचाऱ्यांना एक आठवड्याआड कामावर येण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मोदी सरकारनं विमान सेवेवर लादण्यात आलेले निर्बंध आणखी कठोर केले आहेत. येत्या २२ मार्चपासून परदेशांमधून येणारी विमानं भारतीय विमानतळांवर उतरू दिली जाणार नाहीत. ही बंदी एक आठवड्यासाठी लागू असेल. परदेशांमधून येणाऱ्या व्यक्तींमुळेच देशात कोरोनाचा संसर्ग झाल्याच्या घटना घडल्याचं आकडेवारीतून समोर आलंय. त्या पार्श्वभूमीवर सरकारनं हा निर्णय घेतलाय.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज