मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात शेकडो महिलांसमोर चुकीची माहिती अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे यांनी दिली. त्यांची ही चूक सीईओ प्रकाश वायचळ यांनी जाहीर सभेत दाखवून दिल्यानंतर सीईओ वायचळ यांचे भाषण सुरू असतानाच डॉ. गुंडे यांनी व्यासपीठावरुन काढतापाय घेतला. त्यामुळे यावेळी हा विषय चांगलाच चर्चेचा ठरला.
जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने शुक्रवारी आसरा पुलानजीक असलेल्या जामगुंडी मंगल कार्यालयात ‘आदर्श अंगणवाडी सेविका’ पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सीईओ व अतिरिक्त सीईओ यांच्यात चूकभूल काढण्याची मोहीम रंगली.
यावेळी बोलताना डॉ. गुंडे म्हणाले की, दर हजारी पुरुष जन्मदर हा 927 इतका आहे. त्यामुळे अजूनही 73 मुलांना लग्नासाठी मुलगी शोधण्याची प्रतीक्षा करण्याची वेळ आहे. महिला व पुरुष जन्मदर सारखा रहावा यासाठी आणखीन जोमाने काम होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
डॉ. गुंडे यांचे भाषण झाल्यानंतर सीईओ वायचळ यांनी भाषण करताना डॉ. गुंडे यांनी केलेले वक्तव्य खोडून काढले. दरहजारी 927 नव्हे, तर 944 मुलींच्या जन्माचे प्रमाण आहे. त्यामुळे चांगलेच काम होत असल्याचे सांगून त्यांनी सेविका व मदतनीस यांच्या कार्याचा गौरव व्यक्त केला. वायचळ यांचे भाषण सुरू असतानाच व्यासपीठावरून गुंडे यांनी काढता पाय घेतला. त्यामुळे हा विषय याठिकाणी चांगलाच चर्चेचा ठरला होता.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज