मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । जेव्हा एखादा पुरुष महिलेला स्पर्श करतो अथवा तिला बघतो, त्यावेळी त्या पुरुषाचा हेतू काय असतो, हे महिलेला समजतं. ही एक निसर्गाने त्यांना दिलेली देणगी आहे, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांनी निरीक्षण नोंदविले आहे.
४१ वर्षीय उद्योगपती विकास सचदेव यांनी डिसेंबर २०१७ मध्ये विमान प्रवासादरम्यान एका अभिनेत्रीचा विनयभंग केला होता. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी पीडित अल्पवयीन होती. या प्रकरणी सत्र न्यायालयाने सचदेव यांना दोषी ठरवत त्यांना विनयभंग तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा अर्थात ‘पॉक्सो’तील तरतुदीनुसार तीन वर्षाची शिक्षा सुनावली होती
याला सचदेव यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. यावरील सुनावणीवेळी सचदेव यांचे वकील अनिकेत निकम यांनी कोर्टासमोर, त्यांच्या अशिलास चुकीच्या पद्धतीने दोषी ठरविण्यात आले. त्यांच्या पायाचा स्पर्श पीडितेला होणे ही चूक आहे. मात्र, त्यातून पीडितेला त्रास देण्याचा त्यांचा उद्देश नव्हता, अशी बाजू कोर्टासमोर मांडली.
विमानात पुरेशी जागा होती. तरीही त्यांनी दुसऱ्या सीटवर त्यांचे पाय आणि हात का ठेवले? असा सवाल कोर्टाने उपस्थित केला. स्त्रियांना याची कमी माहिती असेल, मात्र एखाद्या पुरुषाने केलेला स्पर्श अथवा तो तिला जेव्हा पाहतो त्यावेळी पुरुषाचा त्यामागचा हेतू महिलेला समजलेला असतो. ती त्यांना निर्सगाने दिलेली देणगीच आहे, असे निरीक्षण न्यायमूर्ती चव्हाण यांनी सुनावणीदरम्यान नोंदविले.
केवळ पीडितच संशयित व्यक्तीच्या हेतूविषयी सांगू शकते. संशयित कधीही जाणूनबुजून स्पर्श केल्याचे कबूल करणार नाही, असेही त्यांनी नमूद केले आहे.
”तुम्ही (सचदेव) बिझनेस क्लासमधून प्रवास करत होता. तेथे पुरेशी जागा होती. तरीही तुम्ही तुमचे पाय एखाद्याच्या हातावर का ठेवले?” असा सवाल न्यायमूर्ती चव्हाण यांनी केला.
पीडितेने विमानातील कर्मचाऱ्यांकडे याबाबत तक्रार केली नाही आणि त्या हसऱ्या चेहऱ्याने विमानातून बाहेर पडल्या, असे सचदेव यांच्या वकिलाने कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले. मात्र, कोर्टाने त्यांचा हा मुद्दा खोडून काढत, अशी घटना घडल्यावर महिलेने कसं वागलं पाहिजे याचा काही फॉर्म्युला नसल्याचे स्पष्ट केले
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज