मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
आठ वर्षांपासून रखडलेली शिक्षक भरती नव्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात मार्गी लागेल, या आशेने नुकत्याच झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी राज्यातून तीन लाख 43 हजार विद्यार्थी बसले. मात्र, या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील त्रुटींमुळे विद्यार्थ्यांना उत्तर लिहता आले नाहीत. त्यावर अंतिम निर्णय घेण्यासाठी तब्बल 45 तज्ज्ञांची नियुक्ती करुन अंतिम उत्तरसूची तयार करण्यात आली. दरम्यान, या परीक्षेतील पेपर एकचे सहा तर पेपर दोनचे तीन प्रश्न रद्द करण्याचा निर्णय तज्ज्ञांनी घेतला आहे.
डीटीएड व बीएड, बीपीएड पूर्ण करुनही शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेतील भावी गुरुजींनी स्वप्नपूर्तीसाठी टीईटीची परीक्षा दिली.
मात्र, त्या प्रश्नपत्रिकेतील चुकांमुळे त्यांची चिंता वाढली आणि काहींनी अंदाजे उत्तर लिहीले तर काहींनी उत्तरच लिहीले नाही. विद्यार्थ्यांच्या तक्रारीनंतर प्रत्येक विषयांतील त्रुटी पडताळणीसाठी किमान चार तज्ज्ञ नियुक्त करण्यात आले. त्यांच्या माध्यमातून अंतिम उत्तरसूची तयार करुन त्यावर विद्यार्थ्यांना आक्षेप नोंदवण्यास सांगितले. त्यानुसार विद्यार्थ्यांनी आक्षेप नोंदवले असून 20 फेब्रुवारीपर्यंत त्यावर निर्णय घेतला जाणार आहे. त्रुटी असलेले प्रश्न वगळून उर्वरित गुणावरुन निकाल जाहीर केला जाणार आहे. 15 मार्चपूर्वी टीईटी परीक्षेचा निकाल जाहीर होईल, असे नियोजन शिक्षण परिषदेने केले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज