मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
दोन लाख रुपयांपर्यंत थकबाकीदार शेतकऱ्यांचा ७/१२ उतारा कोरा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे. या योजनेची संपूर्ण प्रक्रियाच आता शेवटच्या टप्यात पोहचली आहे. मार्चएण्ड पूर्वीच सोलापूर जिल्ह्यातील ८८ हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. सोलापूर जिल्ह्यात कर्जमुक्तीस ८८ हजार ९०० शेतकरी पात्र ठरण्याची शक्यता आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे ४३ हजार शेतकऱ्यांची यादी बिनचूक तयार झाली आहे. ४३ हजार शेतकऱ्यांच्या बॅंक खात्याची लेखापरीक्षकांकडून पडताळणीदेखील करण्यात आली. त्यामुळे या यादीत एकही चूक आढळलेली नाही.
राष्ट्रीयकृत व जिल्हा बॅंकेचे मिळून एकत्रीत ८८ हजार ९०० शेतकरी पहिल्या टप्यात पात्र आहेत. या शेतकऱ्यांच्या याद्या शासनाच्या महाऑनलाईन पोर्टलवर अपलोड केले जात आहेत. त्यापैकी ७५ हजार शेतकऱ्यांची यादी अपलोड करण्याचे काम पूर्ण झाले आहे. येत्या १५ फेब्रुवारीपर्यंत शेतकऱ्यांची संपूर्ण यादी पोर्टलवर अपलोड होणार आहे. त्यानंतर कर्जमुक्तीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची यादी प्रत्येक गावात डकविली जाणार आहे. यादीत समावेश असलेल्या शेतकऱ्यांना स्वत:चे आधार पडताळणी करुन घ्यावी लागणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रांवर जाऊन शेतकऱ्यांना आधार पडताळणी करुन घ्यावी लागणार आहे. मार्चएण्डपूर्वी सोलापूर जिल्ह्यातील कर्जमुक्ती योजनेची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सहकार विभागाच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज