मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
अवैध सावकारी करणाऱ्या दोघा सावकारांविरोधात वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोपट दशरथ झेंडे (रा. झेंडेवाडी, ता. पुरंदर) आणि अनिल रावडे (पूर्ण नाव नाही, रा. शिंदेवाडी, हंडाळवाडी, ता. दौंड) अशी गुन्हा दाखल झालेल्या सावकारांची नावे आहेत.
याबाबत भोंडवेवाडी (ता. बारामती) येथील महादेव निवृत्ती घोडके या सलून व्यावसायिकाने फिर्याद दाखल केली. गेल्या दोन वर्षांपासून या सावकारांकडून त्रास दिला जात असल्याचे फिर्यादीत त्यांनी म्हटले आहे. पोपट झेंडे यांनी फिर्यादीला पाच लाख रुपये दरमहा १० टक्के व्याजाने दिले होते.
त्या बदल्यात घोडके यांच्याकडून सह्या केलेले दोन धनादेश घेण्यात आले होते. या रकमेपोटी घोडके यांनी ९ लाख रुपये परत केले होते. तरीही झेंडे यांनी त्यांच्या घरी जावून दमदाटी, शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली. तसेच घरातील कपाटात ठेवलेले ८० हजार रुपये जबरदस्तीने काढून नेले.
अनिल रावडे यांनी फिर्यादीला एक लाख रुपये दरमहा १० टक्के व्याजाने दिले होते. त्याबदल्यात दीड लाख रुपये परत करण्यात आले होते. त्यानंतर महादेव घोडकेकडे त्यांनी एक मोटार भाडोत्री मागितली होती.
यानंतर शिंदेवाडी येथे घोडके मोटार घेवून गेले असताना त्याला जबरदस्तीने गाडीतून खाली ओढत गाडी काढून घेण्यात आली. तसेच प्रत्येकी एक लाख रुपयांचे दोन धनादेश आणण्यास सांगण्यात आले. याशिवाय आरटीओ कार्यालयात घेवून जावून तेथे टीटी फॉर्मवर त्यांच्या जबरदस्तीने सह्या घेण्यात आल्या असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज