मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । संपूर्ण महाराष्ट्रात लाखो गुंतवणूकदार असलेल्या समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज को. आॅप. सोसायटीच्या गुंतवणूकदारांना दिलासा देणारी बातमी हाती आली आहे. या सोसायटीमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांची रक्कम लवकरच संबंधित व्यक्तींच्या खात्यात जमा करण्यात येईल, अशी ग्वाही प्रशासकांचे स्वीय सहाय्यक मिलींद राले यांनी दिली. त्यामुळे लाखो गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला आहे.
आनंदवन वरोरा येथे समृद्ध जीवनच्या ठेवीदार व अभिकर्त्यांद्वारा आयोजित बैठकीदरम्यान स्वीय सहाय्यक मिलींद राले यांनी फोनवरून संवाद साधला
चंद्रपूर, भद्रावती, वरोरा, हिंगणघाट, वणी, मारेगाव इत्यादी जवळपासच्या तालुक्यातील ठेवीदार व अभिकर्ते यांच्यातर्फे आनंदवन वरोरा येथे बुधवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. समृद्ध जीवनचे दिवाळे निघाल्यामुळे ठेविदारांना पैसे परत मिळणार की नाहीत, याबाबत साशंकता होती. प्रशासक सतिश क्षीरसागर यांचे स्वीय सहायक मिलींद राले यांनी यावेळी ठेविदारांसोबत फोनवरून चर्चा करून दिलासा दिला.
सोसायटीच्या ३७५ मालमत्ता जप्त केल्या असून सेबी व ईडीकडून विक्रीस मान्यता मिळण्याकरिता प्रयत्न सुरू आहेत.
लवकरच यासंदर्भात वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात प्रकाशित करण्यात येईल, अशी माहिती स्वीय सहायक मिलींद राले यांनी दिली आहे. त्यानुसार ठेविदारांना कागदपत्रे आॅनलाइन पध्दतीने अपलोड करावे लागतील. ठेविदारांच्या कागदपत्रांची तपासणी करूनच संबंधितांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात येणार आहे.
तोपर्यंत ठेविदारांनी संयम राखण्याचे आवाहन स्वीय सहाय्यक मिलींद राले यांनी केले आहे.
अनेक राज्यात केला विस्तार
मुदत ठेव व आवर्त ठेवच्या माध्यमातून अनेकांनी समृध्द जीवनमध्ये पैसा गुंतविला. समृध्द जीवनने आपल्या कार्यक्षेत्राचा विस्तार करून महाराष्ट्रासह उत्तराखंड, ओडिसा, पंजाब, राजस्थान, उत्तरप्रदेश, आंध्रप्रदेश, बिहार, छत्तीसगढ, दिल्ली, गोवा, गुजरात, कर्नाटक व मध्यप्रदेशात आपली कार्यालये स्थापन केली. मात्र, अल्पावधीतच कंपनीचे दिवाळे निघाल्याने लाखो ठेविदारांचे पैसे बुडाले. त्यातच कंपनीबद्दल कुठलीही माहिती ठेविदारांना माहीत होत नव्हती. मात्र, स्वीय सहाय्यकांनी दिलासा देत लवकरच पैसे परत मिळणार असल्याचे सांगितले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज