मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
दिल्ली विधानसभा निवडणुकीचा जोरदार प्रचार सुरू आहे. भाजपा आणि आप अशा राजकीय पक्षांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपही केले जात आहेत. दिल्लीत पुन्हा आपचीच सत्ता येणार, असं बऱ्याच ओपिनियन पोलमधून समोर आलं होतं. परंतु भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी दिल्लीत यंदा भाजपा सत्ता स्थापन करेल, असा अंदाज वर्तवला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपा 41हून अधिक जागा जिंकेल, असं भाकीत भाजपाचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी वर्तवले आहे.
सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट करत हा दावा केला आहे. तुकडे तुकडे गँगने रास्ता रोको केल्यानं अर्थव्यवस्थेला फटका बसला, तरीही भाजपा 41 जागा जिंकेल. शाहीन बाग आंदोलन आणि अर्थव्यवस्थेला मरगळ आलेली असतानाही भाजपा दिल्लीत विजयी होणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
शाहीन बागमध्ये सुरू असलेल्या आंदोलनामुळे आम आदमी पार्टी आणि भाजपा आमने-सामने आलेले आहेत. त्यातच भाजपा या आंदोलनाचा राजकीय दृष्टिकोनातून फायदा उचलत असल्याचा आरोप आपच्या अरविंद केजरीवालांनी केला आहे.
तर भाजपाचे नेते मनोज तिवारी आणि खासदार परवेश वर्मा हे शाहीन बाग आंदोलनावरून आम आदमी पार्टीवर पलटवार करत आहेत. देशभरात नागरिकत्व सुधारणा विधेयकावरून निषेध मोर्चे आणि आंदोलनं काढली जात आहेत. त्यातच शाहीन बागमधल्या आंदोलनात एका तरुणानं गोळीबार केल्यानं हे प्रकरण चांगलेच तापले होते.
भाजपानंही या मुद्द्यावर आम आदमी पार्टीला घेरण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. त्यामुळे दिल्ली विधानसभेत शाहीन बागचा मुद्दा गाजतोय. दिल्ली विधानसभेसाठी 8 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, 11 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत आपनं 70 पैकी 67 जागांवर विजय मिळवला होता. भाजपला तीन जागांवर यश मिळाले तर काँग्रेसला खातंही उघडता आले नव्हते.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज