मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।
सोलापूरचे भाजप खासदार डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या जात प्रमाणपत्रासंदर्भातील कागदपत्रांची फेर चौकशी करून सहा महिन्यात पुन्हा निकाल द्यावा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्याची माहिती समितीचे वकिल श्रीकांत शिवलकर यांनी बोलताना दिली. न्यायालयाच्या या निकालामुळे डॉ. महास्वामींना तुर्तास मोठा दिलासा मिळाल आहे.
भाजपचे खासदार डॉ. महास्वामी यांनी लोकसभा निवडणुकीत बनावट जात प्रमाणपत्र दिल्याची याचिका जात पडताळणी समितीकडे दाखल झाली होती. त्याअनुषंगाने दक्षता समितीने खासदार डॉ. महास्वामींच्या जात प्रमाणपत्रासंबंधी सखोल चौकशी करून कागदपत्रांची पडताळणी केली.
त्यानंतर जात प्रमाणपत्राचा अंतिम निकाल देत त्यांचे प्रमाणपत्र बनावट असल्याचा निकाल दिला. जात पडताळणी समितीच्या आदेशानुसार अक्कलकोट तहसीलदारांनी त्या प्रकरणी फौजदार चावडी पोलिसांत गुन्हा देखील झाला होता.
पोलिसांच्या चौकशीअंती बनावट जात प्रमाणपत्र बनवून दिल्याप्रकरणी आणखी एकाविरूद्ध गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर डॉ. महास्वामींना काही दिवस शहर पोलिसांत हजेरी देखील द्यावी लागत होती.
तत्पूर्वी, जात पडताळणी समितीच्या निकालाविरोधात डॉ. महास्वामींनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर बुधवारी (ता. ५) उच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली. त्यावेळी जात पडताळणी समितीच्या वतीने ॲड. शिवलकर हे देखील हजर होते. तर डॉ. महास्वामींतर्फे ॲड. थोरात, ॲड. महेश देशमुख, ॲड. महेश स्वामी आदी उपस्थित होते.
सोलापूर जिल्हा जात पडताळणी समितीने खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या जात प्रमाणपत्रासंदर्भात दिलेला निकाल उच्च न्यायालयाने रद्द ठरविला.
डॉ. महास्वामी यांनी सादर केलेल्या संपूर्ण कागदपत्रांची पुन्हा एकदा पडताळणी करून सहा महिन्यात निकाल द्यावा, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.
आता जात पडताळणी समिती न्यायालयाच्या आदेशानुसार सहा महिन्यांत डॉ. महास्वामी यांच्या जात प्रमाणपत्रावर फेर निकाल देईल, अशी माहिती समितीचे वकील श्रीकांत शिवलकर यांनी दिली.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज