टीम मंगळवेढा टाईम्स ।
शेतकऱ्याच्या पोराला उद्योजक बनवण्यासाठी भाजप सरकारने प्रयत्न केले; परंतु अलीकडच्या वर्षभराच्या काळात राज्य सरकारने अनेक महामंडळे बरखास्त करून उद्योजक तरुणांना आत्महत्येशिवाय पर्याय नाही, अशी धोरणे राबविली, असा आरोप पुणे पदवीधर मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार संग्राम देशमुख यांनी केला.
पुणे पदवीधर मतदार संघाच्या निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने ते बोलत होते. या वेळी खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार प्रशांत परिचारक, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, सोलापूर जिल्हा पदवीधर प्रमुख शशिकांत चव्हाण, तालुकाध्यक्ष संतोष भोगले, शहराध्यक्ष गौरीशंकर बुरकूल, स्वप्नील नलवडे, नगरसेवक अजित जगताप, दीपक माने, नागेश डोंगरे, शिवानंद पाटील, औदुंबर वाडदेकर, विजय बुरुकूल, हरिदास हिप्परकर यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे आजी – माजी पदाधिकारी, पदवीधर, इतर मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.
संग्राम देशमुख पुढे म्हणाले, की शेतकऱ्याच्या पोरांनी उद्योजक बनावे यासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळ व इतर महामंडळांच्या जोरावर तरुणांनी उद्योग उभा करून बॅंकेकडे कर्ज मागणी केली.
नवीन सरकारने वर्षभरामध्ये या महामंडळांमध्ये कोणत्याही प्रकारच्या निधीची तरतूद केली नाही. त्यामुळे कर्जदार उद्योजक तरुणाची थकबाकी वाढून अशा तरुणांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही, अशी धोरणे वर्षभराच्या काळात या सरकारने राबवली.
पदवीधरांसाठी स्वतंत्र मंत्रालय उभारणी झाल्यास त्यांचे प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे. अलीकडच्या काळात पदवीधर तरुणांचा स्पर्धा परीक्षेकडे कल वाढला असून, त्यासाठी त्यांना जिल्हा स्तरावर वाचनालय व आधुनिक पद्धतीने अभ्यास करून त्यांना चुणूक दाखवता येईल अशा पद्धतीने नियोजन जिल्हा स्तरावर करण्याचा प्रयत्न आहे.
माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी, ज्या विरोधी उमेदवाराचे वय 73 वर्षे आहे आणि ज्या भाजप व मित्रपक्षाच्या उमेदवाराची जन्मतारीख 1973 आहे याची तुलना करताना जो उमेदवार विधान परिषदेच्या पायऱ्या वाघासारखा चढेल अशा उमेदवारांना पदवीधर मतदारसंघातून विजयी करा, असे आवाहन केले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज