टीम मंगळवेढा टाईम्स ।
‘मी भारतनानांचा बछडा आहे, मैदान सहजासहजी सोडणार नाही’, असे आव्हान विरोधकांना देत ‘अडचणी कितीही येऊद्यात, त्यावर मात करण्यासाठी माझे प्रयत्न सुरूच आहेत. त्यावर मात करणारच असे प्रतिपादन श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष भगीरथ भालके यांनी केले.
दिवंगत आमदार भारत भालके यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त सरकोली (ता. पंढरपूर) येथे आदरांजली वाहताना भगीरथ भालके बोलत होते.
त्यांनी दिलेल्या आव्हानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. आर्थिक कारणावरून अडचणीत आलेला विठ्ठल साखर कारखाना सुरू करण्याच्या संदर्भात आर्थिक मदत उपलब्ध करण्यासाठी तीन महिने सातत्याने वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू असल्यामुळे भगीरथ भालके नॉट रिचेबल होते.
त्याबाबत सोशल मीडिया व अन्य काही माध्यमांतून त्यांच्यावर टीकेची झोड उठवली जात असतानाही, त्या आरोपांना त्यांनी प्रतिक्रिया दिली नव्हती. त्यामुळे आज दिवंगत आमदार भारत भालके यांच्या प्रथम पुण्यतिथी दिनानिमित्त ते काय बोलणार, याची उत्सुकता उपस्थितांना लागली होती.
भगीरथ भालके म्हणाले, गेली तीन महिने मी जरी तुमच्या संपर्कात नसलो तरी माझे भाऊ, पत्नी सातत्याने जनतेच्या संपर्कात होते.
गरिबांच्या मांडीला मांडी लावून बसून त्या गरिबांची दुःखे समजून घेण्याबाबत दिवंगत भारतनानांची शिकवण आपण कायम ठेवली आहे.
मी जरी संपर्कात नसलो तरी माझे नातेवाईक आपल्या संपर्कात आहेत. त्यामुळे आलेल्या अडचणींवर आपण लवकरच मात करणार आहोत, असे सांगून त्यांनी उपस्थितांना दिलासा दिला.
हे राजकीय व्यासपीठ नसल्याने त्यावर अधिक न बोलता त्यांनी दिवंगत आमदार भारत भालके यांच्या आठवणींना उजाळा देत, पित्याचा हात डोक्यावर नसल्यावर वेगवेगळ्या अनुभवांना कसे सामोरे जावे लागले, हे सांगत आदरांजली वाहिली.
या वेळी पंढरपूर, मंगळवेढ्यातील अनेक सामाजिक, राजकीय, शिक्षण आदी क्षेत्रातील मान्यवरांनी भारत भालक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.(स्रोत:सकाळ)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज