टीम मंगळवेढा टाइम्स ।
आषाढी यात्रा काळात यंदाही 17जुलैपासून 24जुलै पर्यंत 9 दिवस संचारबंदी लागू केली असताना काही भाविक त्यापूर्वीच पंढरपूर मध्ये विविध मठात येऊन दाखल होण्यास सुरुवात झाल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.
आता अशा भाविकांना बाहेर घालवण्यासाठी सर्व मठ आणि धर्मशाळांना पोलिसांनी नोटीस बजावल्या असून तपासणीमध्ये जे भाविक पंढरपूरमध्ये आषाढीसाठी वास्तव्याला आलेले असतील त्यांना पोलीस शहराबाहेर पाठवून देणार आहेत.
आषाढीसाठी मानाच्या 10 पालखी सोहळ्यातील 400 भाविक आणि 195 मठाधिपती यांना शासनाने शहरात थांबण्याची परवानगी दिलेली आहे. यांना वगळता जे भाविक आषाढीपूर्वी दाखल झाले आहेत त्यांना बाहेर काढण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सांगितले.
अजूनही पंढरपूरमध्ये कोरोनाचे संकट संपलेले नसल्याने भाविकांच्या आरोग्यासाठी हे पाऊल उचलले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आषाढी यात्रेसाठी चंद्रभागा स्नानालाही बंदी घालण्यात आलेली असल्याने ज्यांना परवानगी दिलेली आहे. असेच भाविक चंद्रभागेपर्यंत पोचू शकणार आहेत. सोलापूर जिल्ह्यापासून पंढरपूर शहरापर्यंत त्रिस्तरीय नाकेबंदी करण्यात येणार असल्याने एकही परवानगी नसलेल्या भाविकाला सोलापूर जिल्हा हद्दीत प्रवेश करता येणार नाही.
आषाढी बंदोबस्तासाठी येणाऱ्या सर्व अधिकारी कर्मचारी हे शक्यतो दोन लस घेतलेले असावेत अशी तयारी केली असून प्रत्येकाची कोरोना चाचणी केली जाणार असल्याचेही पोलीस अधीक्षक सातपुते यांनी सांगितले . याशिवाय बंदोबस्ताला येणाऱ्या प्रत्येक कर्मचारी अधिकाऱ्याला कोरोना किट दिले जाणार असून कोरोनाच्या दृष्टीने सर्व तयारी केल्याचे त्यांनी सांगितले . आषाढीसाठी मुख्यमंत्री महापूजेला येणार असल्याने मंदिरात पूजेच्यावेळी कमीत कमी उपस्थितीबाबत प्रस्ताव शासनाला दिल्याचेही सातपुते यांनी सांगितले .
कोरोना संकटात सलग दुसऱ्या दिवशी होत असलेल्या आषाढी यात्रेसाठी प्रशासनाने कठोर पावले उचलली असून 17 जुलैपासून 25 जुलैपर्यंत पंढरपूर शहरासह शेजारच्या 10 गावात संचारबंदीची घोषणा करण्यात आली आहे .
या संपूर्ण 9 दिवसाच्या कालावधीत पंढरपूर डेपोमधील एसटी बस सेवेसह सर्व खाजगी वाहनांची वाहतूक बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आषाढ शुद्ध अष्टमी अर्थात 17 जुलैच्या दुपारी 2 वाजल्यापासून संचारबंदीला सुरुवात होणार असून हे संचारबंदी 25 जुलै म्हणजे आषाढ शुद्ध पौर्णिमेच्या दुपारी चार वाजेपर्यंत राहणार आहे.
पंढरपूर शहरासह शेजारील वाखरी, भटुंबरे, चिंचोली भोसे, शेगाव दुमाला, लक्ष्मी टाकळी, गोपाळपूर, कोर्टी , गादेगाव, शिरढोण आणि कौठाळी या दहा गावात या नऊ दिवसात काटेकोरपणे संचारबंदीचे अवलंब केले जाणार आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज