मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
यंदाच्या खरीप हंगामातील दुष्काळाचे मूल्यांकन महामदत प्रणालीमार्फत करण्यात आले आहे. यानुसार महाराष्ट्रातील ४२ तालुक्यांमध्ये ट्रिगर १ व २ लागू झाले आहे.
यातील काही गावांमध्ये ५० टक्के, तर काही गावांमध्ये ७५ टक्के कमी पाऊस पडल्याने ट्रिगर लागू झाले आहेत.
आता शेतीपिकांचे नुकसान झाल्याबाबत क्षेत्रीय सर्वेक्षण करून दुष्काळ मध्यम स्वरूपाचा आहे की गंभीर याबाबतचा उल्लेख करून १७ ऑक्टोबरपर्यंत अहवाल सादर करा, असे निर्देश राज्याचे महसूल उपसचिव संजय धारूरकर यांनी दिले आहेत.
यानुसार सर्व जिल्हाधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडून विविध नमुन्यांमध्ये माहिती मागवली आहे.
दरम्यान सोलापूर जिल्ह्यात करमाळा, माढा, बार्शी, माळशिरस, सांगोला या तालुक्यांचा समावेश असल्याचे दिसत असले तरी मंगळवेढा तालुक्याचा समावेश करावा अशी मागणी पुढे येऊ लागली आहे.
यामुळे आज मंगळवारी राज्य शासनाकडे सादर होणाऱ्या अहवालातून नेमके काय वास्तव समोर येते व दुष्काळी मदत कधी मिळते याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत.
दुष्काळाचा टिगर लागू झालेल्या तालुक्यातील १० टक्के गावे रँडम पद्धतीने निवडून ७ ऑक्टोबर २०१७ व २८ जून २०१८ मधील सूचनानुसार क्षेत्रीय सर्वेक्षणाची कार्यवाही हाती घेण्यात आली आहे.
यात क्षेत्रीय सर्वेक्षण करण्यासाठी महाराष्ट्र सुदूर संवेदन उपयोजन केंद्र,नागपूर यांच्याकडून तयार करण्यात आलेल्या महामदत या मोबाइल अॅपची मदत घेतली जात आहे. या अॅपद्वारे सर्वेक्षण पूर्ण करून दुष्काळी परिस्थिती आहे की किंवा कसे, असल्यास दुष्काळ मध्यम की गंभीर स्वरुपाचा आहे.
याबाबत उल्लेख करून जिल्हास्तरीय दुष्काळ देखरेख समितीकडून विविध प्रपत्रातील अहवाल मागवण्यात आला आहे. या अहवालानुसारच शासनस्तरावरून दुष्काळ जाहीर करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.
जिल्हानिहाय ट्रिगर १, २ लागू झालेले तालुके
सोलापूर : करमाळा, माढा, बार्शी, माळशिरस, सांगोला, छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर, सोयगाव
• जालना : जालना, भोकरदन, बदनापूर, अंबड, मंठा • बीड: वडवणी, धारूर, अंबाजोगाई – लातूर : रेणापूर धाराशिव वाशी, . धाराशिव, लोहारा जळगाव : चाळीसगाव बुलडाणा : बुलडाणा, लोणार : नाशिक : मालेगाव, सिन्नर, येवला पुणे : शिरूर, . घोडनदी, मुळशी पौंड, दौंड, पुरंदर सासवड, वेल्हा, बारामती, इंदापूर • सातारा : वाई, खंडाळा कोल्हापूर : हातकणंगले, गडहिंग्लज • . सांगली : शिराळा, कडेगाव, खानापूर, विटा, मिरज.
प्रमुख पाच पिकांचे करणार क्षेत्रीय सर्वेक्षण
क्षेत्रीय सर्वेक्षणासाठी निवडलेल्या गावांमधील सोयाबीन, कापूससह प्रमुख पाच पिकांचे उत्पादन विचारात घेतले जाणार आहे बुधवारी सायंकाळपर्यंत सर्व माहिती शासनाला सादर केली लाईल. डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हाधिकारी, जालना.(स्रोत:दिव्य मराठी)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज