टीम मंगळवेढा टाईम्स।
गेल्या तीन वर्षांपासून सतत चर्चेत अन् प्रलंबित असलेल्या मंगळवेढा व सांगोला तालुक्यातील छावणी चालकांच्या थकीत बिलांचा प्रश्न येत्या पंधरा दिवसात संबंधित विभागाची बैठक घेऊन मार्गी लावण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
मंगळवेढा व सांगोला तालुक्यातील छावणी चालकांची लाखो रूपयांची बिले गेल्या तीन वर्षांपासून रखडली आहेत. त्यामुळे संबंधित छावणी चालक हतबल झाले आहेत. या छावणी चालकांनी अनेक वेळा शासन दरबारी बिलांच्या मागणीसाठी हेलपाटे घातले.
परंतु बिले मिळाली नाहीत. पुन्हा एकदा या प्रलंबित बिलांच्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी मंगळवेढा येथील भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत यांच्या पुढाकाराने छावणी चालकांनी मंगळवारी मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंत यांची भेट घेतली. तसेच त्यांना लेखी निवेदन सादर केले.
यावेळी अनिल सावंत म्हणाले, सन २०१९ च्या दुष्काळात मंगळवेढा व सांगोला तालुक्यामध्ये हजारो जनावरांची उपासमार होऊ नये, म्हणून शासनाच्या निर्देशांनुसार चारा छावण्या सुरू करण्यात आल्या होत्या. त्यावेळी छावणी चालकांनी शासकीय नियम व अटींचे पालन करीत छावण्या सुरू ठेवल्या.
यामध्ये जनावरे जतन करताना चारा, पशुखाद्य व इतर खर्चाची देयके देण्यासाठी स्थानिक संस्था व बँकांची कर्जे काढली. यादरम्यान, काही बिले शासनाकडून मिळाली आहेत.
परंतु शेवटच्या टप्प्यातील मंगळवेढा व सांगोला या तालुक्यातील जवळपास ३८ कोटी रुपयांची देयके प्रलंबित आहेत. ही बिले लवकर मिळावीत, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी येत्या पंधरा दिवसात बैठक लावून प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन दिले.
मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत रखडलेल्या बिलांचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्याने छावणी चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सावंत बंधूंच्या माध्यमातून हा प्रश्न थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारात गेल्याने तो मार्गी लागण्याची चिन्हे निर्माण झाली असल्याच्या प्रतिक्रिया उपस्थित छावणी चालकांनी व्यक्त केल्या.
या भेटीप्रसंगी आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, भैरवनाथ शुगर्सचे व्हा. चेअरमन अनिल सावंत, पाटखळचे सरपंच ऋतुराज बिले, गौडापा बिराजदार, अशोक लेंडवे, संभाजी लवटे, विष्णू मासाळ, पप्पू स्वामी, हौसप्पा शेवडे, ताय्यापा गरंडे, निलेश आवताडे, गुलाब थोरबोले, नितीन पाटील, दीपक सुडके आदी उपस्थित होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज