टीम मंगळवेढा टाईम्स । पंढरपूर शहर व तालुक्यात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे प्रशासनावर ताण येत असून क्वारंटाइनच्या भितीने अनेक नागरिक पुढे येत नाहीत. याचा विचार करता पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना घरीच ठेवून त्यांच्यावर उपचार करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी आमदार प्रशांत परिचारक यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. Allow patients in Pandharpur to treat patients at home: MLA Prashant Paricharak
आ.परिचारक यांनी कोरोनाच्या अनुषंगाने आज अधिकाऱ्यांची बैठक घेतली. परिस्थितीचा आढावा घेऊन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे या विषयाकडे लक्ष वेधले असल्याचे सांगितले. पंढरपूर शहर व ग्रामीण भागात कोरोना रूग्णांची संख्या साडेचारशेच्या जवळ पोहचली आहे. त्यामुळे प्रशासनावर मोठ्या प्रमाणात ताण पडत आहे.
शहर व तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह निघालेल्या व्यक्तींची संख्या वाढत आहे. त्या लोकांना विलगीकरण कक्षात ठेवणे व गंभीर रूणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करणे, नवीन रूग्ण ट्रेसिंग करणे, अशा प्रकारचे काम पंढरपूर नगरपालिका व पंचायत समिती स्तरावरती सुरू आहे. रूग्णांचे ट्रेसिंग, टेस्टींग व ट्रिटमेंट या चारही बाबी करण्यासाठी प्रशासनाला कुशल मनुष्यबळ लागते. तसेच कोरोना पॉझिटिव्हचा पेशंट आढळून येतो तेथे कंटेन्मेंन्ट जाहीर करून तेथील परिसर बंदिस्त करणे, सॅनिटायझर करणे, स्वच्छता करणे अशा प्रकारची अनेक कामे प्रशासनाला करावी लागतात.
यामुळे प्रशासनावर गेल्या काही महिन्यापासून ताण पडत आहे. यासाठी ज्या रुग्णांना लक्षणे नाहीत, मात्र त्यांच्या घरात स्वतंत्र खोली, बाथरूम, संडास याची सोय असेल तर त्यांच्या घरातच आयसोलेशन करून ठेवावे. कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेले लोक तपासणीसाठी 5 दिवस क्वारंटाइन केले जाते. यामुळे अनेक जण स्वतःहून तपासणीसाठी पुढे येत नाहीत. त्यामुळे अशा लोकांनाही त्यांच्या त्यांच्या घरामध्येच क्वारंटाइन करून केवळ तपासणीसाठीच क्वारंटाइन सेंटरमध्ये बोलवावे. घरामध्ये क्वारंटाईन करून ठेवलेल्या रुग्णांची नियमित तपासणी व चौकशी करणे शक्य आहे. गंभीर रुग्णांनाच उपजिल्हा रूग्णालय व खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करावे, अशी जिल्हाधिकारी यांच्या पत्राद्वारे मागणी केली असल्याची माहिती आमदार प्रशांत परिचारक यांनी दिली.
या बैठकीस मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, उपमुख्य अधिकारी सुनील वाळुजकर आदी उपस्थित होते.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज