टीम मंगळवेढा टाईम्स ।
सध्या महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली असून अनेक रुग्णांना रेमडेसिव्हिर इंजेक्शन मिळत नाहीत पम सोलापूर जिल्ह्यात रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या तिघांना अकलूज पोलिसांनी जेरबंद केले आहे.
सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषित असताना अकलूज पोलिस स्टेशन हद्दीतील काही व्यक्ती स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी कोविड विषाणूच्या आजारावर लागणाऱ्या रेमडेसिव्हिर इंजेक्शन अधिक किंमतीने विक्री करून औषधाचा काळाबाजार करीत असल्याची खात्रीशीर माहिती पोलिस निरीक्षक अरुण सुगावकर यांना मिळाली होती.
हा काळाबाजार रोखण्यासाठी पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगुरू, पोलिस निरीक्षक अरुण सुगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक वैभव मारकड, पोलिस हेडकॉन्स्टेबल सुहास क्षीरसागर, विक्रम घाटगे, मंगेश पवार, निलेश काशीद, अमितकुमार यादव, औषध निरीक्षक सोलापूर व दोन पंचांसह सापळा रचून डमी ग्राहक पाठविण्यात आले.
अण्णासाहेब सुग्रीव किर्दकर (वय २८, रा.चाकाटी लाखेवाडी, ता.इंदापूर, जि.पुणे), अजय महादेव जाधव (वय २३), कुमार महादेव जाधव (वय २१, दोघेही रा.संग्रामनगर, ता. माळशिरस) यांनी संगनमत करून रेमडेसिव्हिर इंजेक्शन मिळविले होते.
त्यांनी कोणताही परवाना नसताना छापील किंमतीपेक्षा ३५ हजार रुपये अधिक दराने, तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या चिठ्ठीशिवाय व कोविड तपासणी अहवालाशिवाय १०० फुटी बायपास रोडवरील अभय क्लिनिकजवळ अकलूज येथे विक्री करून शासनाची फसवणूक केली.
सोलापूरच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे औषध निरीक्षक नामदेव भालेराव यांनी याबाबतची फिर्याद आज पोलिसात दिली आहे. त्यानुसार तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अरुण सुगावकर पुढील तपास करीत आहेत.
अकलूज पोलिस ठाण्याच्या हद्दीत रेमडेसिव्हिर इंजेक्शनची कोणी जास्त पैसे घेऊन विक्री करीत असतील तर ०२१८५-२२२१०० या क्रमांकावर कळवावे. त्यांचे नाव गोपणीय ठेवण्यात येईल.– अरुण सुगावकर, पोलिस निरीक्षक,अकलूज
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज