टीम मंगळवेढा टाईम्स ।
कोरोनाच्या काळात सुद्धा राजकीय वर्तुळात चर्चेत राहिलेल्या मंगळवेढा-पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा आखाडा अखेर निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला आहे.
निवडणुकीकरिता उमेदवारी अर्ज 23 तारखेपासून भरण्यास सुरवात होणार आहे. 17 एप्रिल रोजी मतदान तर 2 मे रोजी मतमोजणी होणार आहे.
राष्ट्रवादीचे दिवंगत आ.भारत भालके यांच्या निधनानंतर पंढरपूर विधानसभेची जागा रिक्त झाली आहे. या जागेवर पवार कुटुंबातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या नावाची मागील काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे.
तर दुसरीकडे भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांनीच ही निवडणूक लढवावी अशी स्थानिक कार्यकर्त्यांची मागणी आहे.या पार्श्वभूमीवर भारत भालके यांच्या पश्चात पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व कोणाकडे जाणार? याची उत्सुकता लागली आहे.
पोटनिवडणूक जाहीर झाली तरी वरिष्ठ पातळीवरून राष्ट्रवादीचा उमेदवार जाहीर झाला नाही. यासंदर्भात आता लवकरच युद्धपातळीवर निर्णय अपेक्षित आहे.
दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे हे निवडणुकीच्या दृष्टीने तयारीत आहेत. उमेदवारीबाबत भाजप व राष्ट्रवादीकडून विचारणा झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.
शिवसेनेच्या महिला आघाडीप्रमुख शैला गोडसे यांनी मूळ जागा ही शिवसेनेची असल्यामुळे आपणालाच उमेदवारी मिळावी अशी मागणी केली आहे. पक्षाकडून उमेदवारी जरी नाही मिळाली तर निवडणूक लढण्यावर ठाम असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच पांडुरंग परिवाराचे प्रणव परिचारक यांनीही निवडणूक लढवण्याचा इरादा स्पष्ट केला, परंतु याबाबतचा निर्णय आमदार प्रशांत परिचारक यांच्यावर सोपवला.
दिवंगत आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनामुळे पंढरपूरची विधानसभेची जागा रिक्त झाली आहे. रिक्त जागी सहा महिन्यांत निवडणूक घेणे आवश्यक असल्याने गेल्या तीन महिन्यांपासून या राजकीय वर्तुळात अनेकांची नावे चर्चेत होती.
परंतु प्रत्यक्षात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर नसल्यामुळे अनेकांनी आपले राजकीय डाव टाकण्यास सुरवात केली. मतदारांशी सातत्याने संपर्क साधला जात आहे. त्यामध्ये घरगुती कार्यक्रमांबरोबर सांत्वन व इतर कार्यक्रमांना हजेरी लावून मतदारांशी जवळीक साधून पोटनिवडणुकीच्या संदर्भात चाचपणी केली जात होती.
सोशल मीडियामध्ये वेगळी नावे आणि त्याबाबतची मते चर्चेत आणून त्यासंदर्भात आपला विचार आणि भूमिका मांडली जात होती. परंतु निवडणूक जाहीर नसल्यामुळे नेमका आखाड्यात कोण उतरणार याची उत्सुकता आणि चर्चा सध्या मतदारसंघात जोरात सुरू असतानाच निवडणूक आयोगाने इतर राज्यांबरोबर महाराष्ट्रातील पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला.
त्यामध्ये 23 मार्चपासून ते 30 मार्चपर्यंत उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात येणार आहेत तर 31 मार्च रोजी अर्जांची छाननी करण्यात येणार आहे.
3 एप्रिल रोजी अर्ज माघारी घेतले जाणार आहेत तर मतदान 17 एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे. मतमोजणी 2 मे रोजी होणार आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या कडक उन्हात राजकीय पडघम जोरात वाजणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज