टीम मंगळवेढा टाईम्स ।
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेनंतर भाजप नेते चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या कारवाईचा तीव्र शब्दात निषेध केलाय.
तर दुसरीकडे भाजप आमदार प्रसाद लाड, आमदार नितेश राणे आणि माजी खासदार निलेश राणे यांनी संगमेश्वर पोलिस ठाण्यातच ठिय्या आंदोलन सुरु केलंय. अशावेळी मुंबईत भाजप नेते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीला राजभवनावर दाखल झाले आहेत.
भाजप नेते विनोद तावडे यांच्यासह काही नेते राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावर पोहोचले आहेत.
महाविकास आघाडी सरकार कशाप्रकारे दडपशाही करत आहे. केंद्रीय मंत्री असलेल्या नारायण राणे यांना प्रोटोकॉल न पाळता अटक करण्यात येत आहे, असा आरोप भाजप नेते करत आहेत.
तसंच नारायण राणे यांचा रक्तदाब वाढला आहे. त्यांची शुगर लेवल आणि ईसीजी करता आला नाही, असं वैद्यकीय पथकानं म्हटलंय. त्यामुळे राणे यांची वैद्यकीय तपासणीतही अडथळे आणण्यात आल्याचा आरोप भाजपनं केलाय.
या पार्श्वभूमीवर आता विनोद तावडे यांच्या नेतृत्वात भाजप नेते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीसाठी राजभवनावर दाखल झाले आहेत. आता राज्यपाल कोश्यारी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं आहे.
राणेंच्या जीवाला धोका; प्रसाद लाड यांचा आरोप
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. यावेळी पोलिसांनी नारायण राणे यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप आमदार प्रसाद लाड यांनी केलाय. इतकंच नाही तर राणे यांच्या जीवाला धोका असल्याचा गंभीर आरोपही लाड यांनी केलाय.
राणे जेवण करत असताना पोलिसांनी त्यांचं जेवणाचं ताट खेचण्याचा प्रयत्न केला. तसा एक व्हिडीओ आपण रेकॉर्ड केल्याचं लाड यांनी सांगितलं. इतकंच नाही तर लाड यांनी एक व्हिडीओही दाखवला आहे.
राणे यांना ताटकळत ठेवून कोर्टात हजर करायचं नाही आणि त्यांचा छळ करण्याचा प्रयत्न सुरु आहे. राणे यांच्या जीवाला धोका आहे. आता एका मंत्र्याचा व्हिडीओ समोर आलाय.
तो मंत्री फोनवरुन पोलीस अधीक्षकांना फोन करुन दबाव टाकताना दिसत आहे, असा आरोपही लाड यांनी केलाय. पोलिस राणेंसोबत ज्या पद्धतीने वागले त्याचा व्हिडीओ माझ्याकडे आहे.
आमदार, खासदार, मंत्री बाजूला ठेवा. पण एका ज्येष्ठ नागरिकांला अशी वागणूक दिली जात आहे, जी चुकीची आहे. राणे यांची अद्याप अटक दाखवण्यात आलेली नाही. त्यांना ताटकळत ठेवण्याचा प्रयत्न सुरु आहे. माझा स्पष्ट आरोप आहे की राणेंच्या जीवाला धोका आहे, असा गंभीर आरोप लाड यांनी केलाय.(स्रोत:tv9मराठी)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज