टीम मंगळवेढा टाईम्स ।
गेल्या दोन वर्षांपूर्वी कोव्हिड-१९ या जीवघेण्या आजाराने हैदोस घातला होता. आता ‘कोरोना’च्या जेएन-१ हा नवा व्हेरियंट आला असून या व्हेरियंटने सोलापुरातील भवानी पेठ येथील एका वृध्दाचा बळी घेतला.
त्यांना रक्तदाब, मधुमेहचा आजार होता. त्यांच्यावर बायपास सर्जरी देखील झालेली होती. त्यांना सारखे झटकेही येत होते. त्यामुळे नातेवाईकांनी त्यांना सोलापुरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्यांची कोरोना चाचणी केल्यानंतर ते पॉझिटिव्ह आढळून आले होते.
उपचार सुरू असताना ३१ डिसेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाला. शुक्रवार, २२ डिसेंबर २०२३ रोजी जेएन-१ या व्हेरियंटचा शहरातील पहिला रुग्ण आढळून आला. गेल्या ८ दिवसात शहरातील संशयित ७३ रुग्णांची कोरोना चाचणी घेण्यात आली.
यातून ६१ जणांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले. रविवार, ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत शहरातील ८ पुरुष व ४ महिला असे एकूण १२ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. यातून पूर्णपणे बरे झालेल्या २ रुग्णांना घरी सोडण्यात आले.
सध्या शहरातील विविध रुग्णालयांमध्ये ८ पुरुष आणि २ महिला अशा १० जणांवर तातडीचे उपचार सुरू करण्यात आले आहेत.
सोलापुरात कोरोना झालेल्यांमध्ये वृध्द पुरुषांची संख्या अधिक आहे. कोरोना संदर्भात पुणे येथील ससून आणि एनआयव्ही अशा दोन ठिकाणी तपासणीसाठी पाठविण्यात येत असून त्याचे अहवाल तेथूनच ऑनलाईन पध्दतीने मिळत आहेत. शहरातील महापालिकेसह खासगी रुग्णालय देखील विविध उपायोजनांसह रुग्णांच्या उपचारासाठी सज्ज झाले असून त्यांना प्रशासनाने विविध सूचना दिल्या
‘मास्क’चा वापर करणे गरजेचे
‘कोरोना’च्या नव्या व्हेरियंटच्या अनुषंगाने महापालिका प्रशासन आणि आरोग्य विभागाकडून विविध उपाययोजना आखण्यात आले आहेत. महापालिकेच्या रुग्णालयात गोळ्या, औषध देखील उपलब्ध आहेत. कोरोनासदृश्य संशयित रुग्णांवर उपचारार्थ नियोजनही करण्यात आले आहे. महापालिकेच्या सर्व आरोग्य केंद्र आणि दवाखान्यांमध्ये टेस्टिंग उपलब्ध करण्यात आली आहे.
नागरिकांनी घाबरून न जाता खबरदारी घ्यावी. संशयित रुग्णांनी संपर्क साधून चाचण्या करून घ्याव्यात. गड्डा यात्रेच्या पार्श्वभूमीवर आजारी रुग्ण आणि ज्येष्ठ नागरिकांनी मास्कचा वापर करणे आवश्यक आहे, असे सोलापूर महापालिकेकडील प्रभारी आरोग्याधिकारी डॉ. मंजिरी कुलकर्णी यांनी सांगितले.
शहरात विविध आजाराने ग्रस्त असलेले रुग्ण आणि वृध्दांची संख्या अधिक असल्याने जिल्हा प्रशासन आणि महापालिका प्रशासन आता मास्क सक्तीचा नियम कडक करणार आहे.
सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिध्देश्वर यात्रा तोंडावर येवून ठेपले आहे. या यात्रेच्या अनुषंगाने सोलापूरसह महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश आदी ठिकाणांहून नागरिक मोठ्या संख्येने येत असतात.
होणारी गर्दी आणि ‘कोरोना’चा जेएन १ या नव्या व्हेरियंटची चिंता सतावत असल्याने सोलापूर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून विविध उपाययोजना आखण्यात येत आहेत. जेएन १ ची लक्षणे ही कोव्हिड १९ शी मिळतेजुळते असल्याचे वैद्यकीय सुत्रांकडून सांगण्यात आले.(स्रोत:पुण्यनगरी)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज