टीम मंगळवेढा टाईम्स ।
कोरोनाच्या उद्रेकाचं केंद्रबिदू ठरलेल्या चीननं संपूर्ण जगाची धाकधूक पुन्हा एकदा वाढवली आहे. चीनमध्ये पुन्हा एकदा एका रहस्यमयी आजारानं हैदोस घातला आहे.
या रहस्यमयी आजाराचा चीनमधील लहान मुलांमध्ये संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, याबाबत बोलताना चीननं सांगितलं आहे की, चीनमधील अनेक लहान मुलांमध्ये इन्फ्लूएंझा सारखे आजार पसरत आहेत.
याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने बीजिंगला रहस्यमय आजाराबद्दल अधिक माहिती देण्यास सांगितलं आहे. रिपोर्ट्सनुसार, चिनी रुग्णालयांमध्ये अनेक आजारी लहान मुलं दाखल झाली आहे.
सर्व लहान मुलांना श्वसनाचा त्रास होत आहे. WHO नं सांगितलं की, नॅशनल हेल्थ कमिशनच्या चिनी अधिकाऱ्यांनी 12 नोव्हेंबरला पत्रकार परिषद घेतली आणि चीनमध्ये श्वसनाच्या आजारांमध्ये वाढ झाल्याची माहिती दिली आहे.
WHO नं रहस्यमयी आजाराच्या उद्रेकासाठी कोविड-19 निर्बंध शिथिल केल्याचा ठपका ठेवला आहे. WHO नं आजारी मुलांमध्ये इन्फ्लूएंझा, SARS-CoV-2, मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया यासंबंधी अतिरिक्त माहिती मागवली आहे. चीनमध्ये आजारी पडण्याच्या अलीकडील घटनांमध्ये कोविडसारखीच लक्षणं पुन्हा दिसून येत आहेत.
रहस्यमयी आजाराचा संसर्ग झालेल्या लहान मुलांच्या कुटुंबीयांच्या वतीनं एका चिनी वृत्तवाहिनीनं सांगितलं आहे की, या आजाराची कोणतीही नवी लक्षणं नाही, परंतु, मुलांना सतत ताप येतोय आणि त्यांच्या फुफ्फुसांत गाठी तयार होत आहेत. लहान मुलांच्या उपचारासाठी चीनच्या रुग्णालयांमध्ये लाबंच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे.
आजारांवर लक्ष ठेवून त्यांचं विश्लेषण करणारी वेबसाईट प्रोमेड मेल अलर्टमध्ये एका मेडिकल स्टाफच्या हवाल्यानं सांगितलं आहे की, “रुग्णांना तब्बल 2 तासांपर्यंत रांगेत वाट पाहत राहावी लागत आहे. बेडही शिल्लक नाहीत.”
चायना डेलीमधील एका अहवालात म्हटलं आहे की, “चीनमध्ये श्वसनासंबंधित आजारांनी डोकं वर काढलं आहे. या रहस्यमयी आजाराचा संसर्ग लहान मुलांमध्ये अधिक दिसून येत आहे.” मीडिया रिपोर्ट्सनुसार, “काही शिक्षकांनाही या आजाराची लागण झाली आहे; या आजारामुळे चीनमधील काही शाळा बंद करण्यात आल्या आहेत.”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज