टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असणाऱ्या भूमिअभिलेख कार्यालयासमोर दक्षिण सोलापूर तालुक्यातील एका शेतकऱ्याने नग्न आंदोलन केले.
सनद मिळविण्यासाठी झालेल्या विलंबामुळे या शेतकऱयाने आंदोलन केले. हे कार्यालय निर्लज्ज असून, नोटा मोजणाऱ्यांची कामे होतात, असा आरोप शेतकऱयाने केला आहे. कुमार नामदेव मोरे असे आंदोलनकर्त्या शेतकऱयाचे नाव आहे.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील शिंगडगाव येथील शेतकरी कुमार नामदेव मोरे यांनी भूमिअभिलेख कार्यालयात सनद मिळावी, यासाठी अर्ज दिला होता.
दिलेल्या तारखेप्रमाणे सनद घेण्यासाठी ते कार्यालयात आले असता कर्मचाऱयांनी उडवाउडवीची उत्तरे देत सनद देण्यासाठी टाळाटाळ करू लागले.
याचवेळी अधिकारी इतरांची कामे मात्र गुचचूपपणे करून देत असल्याचे शेतकऱयाच्या निदर्शनास आले. यामुळे संतप्त झालेल्या मोरे यांनी नग्न होऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला.
तरीही कर्मचाऱयांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे संतप्त झालेल्या कुमार मोरे यांनी कार्यालयासमोर असलेल्या ध्वजस्तंभाखाली संपूर्ण कपडे उतरवून निषेध आंदोलन सुरू केले. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात एकच खळबळ उडाली. बघे आणि प्रसारमाध्यमांची गर्दी झाली.
यावेळी कुमार मोरे यांनी भूमिअभिलेख कार्यालयातील कारभारावर संतप्त भाषेत आरोप केले. या कार्यालयात अंगावरील कपडे काढल्यावरच कामे होतात. सुटाबुटात येणाऱयांची कामे गुपचूप करून देणारे हे कार्यालय निर्लज्ज आहे.
आमच्याकडे नोटा नाहीत, हे सरकार आम्हाला चोऱया करायला शिकविणार आहे काय? आम्ही पैसे कोठून आणून देणार, असा सवाल त्यांनी यावेळी केला.
कार्यालयातील कर्मचाऱयांनी नकाशा आणून दिल्यानंतर मोरे यांनी आंदोलन स्थगित केले. मोरे यांच्या नग्न आंदोलनामुळे शेतकऱयांच्या व्यथा पुन्हा एकदा सर्वांसमोर आल्याची चर्चा सुरू होती.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज