मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
जम्मू आणि कश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात त्राल परिसरात सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिदीनचे तीन दहशतवादी आज ठार झाले. या दहशतवाद्यांची ओळख पटली असून , त्यांची नावे जांगीर रफीक वाणी , राजा उमर मकबुल आणि उजैर अमीन भट अशी आहेत.
त्राल परिसरातील मेंधार सेक्टरमध्ये ही चकमक झाली. हिंदुस्थानचे लष्कर , केंद्रीय राखीव पोलीस दल ( सीआरपीएफ ) आणि जम्मू व कश्मीर पोलीस दलाने संयुक्तपणे पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांविरोधात मोहीम राबवली होती . पुलवामा जिल्ह्यात त्राल येथे दहशतवादी लपून बसल्याची माहिती लष्कराला मिळाल्यानंतर मंगळवारी संध्याकाळी ही संयुक्त शोधमोहीम हाती घेण्यात आली.
दहशतवादी लपून बसले होते , त्या भागाला सुरक्षा दलाने घेरल्यानंतर ही चकमक सुरू झाली . या चकमकीत ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांचे मृतदेह हाती आल्याची माहिती जम्मू – कश्मीर पोलिसांचे महासंचालक दिलबाग सिंग यांनी येथे दिली . मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडून दोन एके रायफल्स , एक पिस्तूल आणि दोन ग्रेनेड जप्त करण्यात आले . गेल्या महिन्यापासून कश्मिरातील मोहिमांत २३ दहशतवादी ठार झाले आहेत . कश्मिरातील ८ मोहिमांमध्ये १९ दहशतवादी ठार झाले , तर जम्मूतील दोन मोहिमांत चार दहशतवादी ठार झाले.
एकूण १० यशस्वी मोहिमा जम्मू आणि कश्मिरात पार पाडल्याचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंग म्हणाले . याशिवाय पोलिसांनी भूमिगतरीत्या काम करणाऱ्या ४० जणांना अटक केली आहे . आज ठार झालेला वाणी हा हिजबुल मुजाहिदीनचा स्वयंघोषित कमांडर होता . वाणी आणि मकबुल हे दोघे मशिदीनजीक गोळीबार आणि दुकाने व ट्रक जाळण्याच्या घटनांत सहभागी होते.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज