
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । कोरोना व्हायरसने जगभरात हाहाकार माजविला आहे. भारतातही ‘कोरोना’ने प्रवेश केला आहे. ‘कोरोना कोव्हीड-१९’ या रोगावार थेट उपचार नसल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर चिकन, मटण खाणाऱ्या लोकांची संख्या प्रचंड कमी झाली आहे. कोंबड्यांच्या मागणीतही मोठी घट झाली आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने होत आहे. दोन दिवसांपूर्वी सोलापूर शहरात कोरोनाचा रुग्ण आढळल्याची चर्चा माध्यमांमध्ये रंगली होती. त्या रुग्णाला झालेला कोरोना हा साधा असून तो कोरोना कोव्हीड-१९ नाही. त्यामुळे लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, घाबरु नये, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी केले आहे.
कोरोना हा व्हायरस झपाट्याने पसरत असल्याच्या अफवेने काहींनी चिकन खाणेच बंद केले आहे. त्यामुळे पोल्ट्री व्यवसायाला मोठा फटका बसत आहे. परिणामी, चिकनच्या दरातही मोठी घसरण झाली होती. शहरात चिकनच्या दरात किलोमागे ५० रुपयांची घसरण झाली आहे. प्रतिकिलो १०० ते १५० रुपयांनी सध्या चिकन विक्री होत आहे. भाजीपाल्याच्या किमतीत चिकन मिळत असल्याने खवय्यांची चंगळ होत आहे. काहींनी कोरोनाची भीती न बाळगता चिकन स्वस्त झाल्याने खाण्याला पसंदी दिल्याचेही विजापूर वेशीतील चिकन विक्रेत्याने सांगितले. याबाबत बाजारात माहिती घेतली असता, कोरोनाच्या भीतीने कोंबड्यांच्या मागणीत घट झाल्याचे सांगण्यात आले. पोल्ट्री व्यावसायिकांकडे मोठ्या प्रमाणावर माल पडून आहे.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












