मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । करोना व्हायरससंबंधी दररोज चिंता वाढवणाऱ्या बातम्या येत असताना आता एक दिलासा देणारी बातमी सुद्धा समोर आली आहे. सध्या देशभरात करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५५० पेक्षा जास्त आहे. दररोज हा आकडा वाढत आहे. पण त्याचवेळी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या अनेक रुग्णांचे करोना चाचणीचे रिपोर्टही निगेटीव्ह येत आहेत. देशाच्या वेगवेगळया भागातील करोनाची बाधा झालेले ४८ रुग्ण उपाचारानंतर पूर्णपणे बरे झाले असून त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सोमवारपर्यंत ३५ रुग्णांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला होता.
मंगळवारी डिस्चार्ज झालेल्या रुग्णांची संख्या १३ ने वाढली. चिंता वाढवणाऱ्या घडामोडींमध्ये ही दिलासा देणारी बाब आहे.सरकारच्या उपायोजनांमुळे दुसऱ्या बाजूला करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्याही कमी होत आहे. सोमवारी ९९ जणांचे करोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यातुलनेत मंगळवारी ६४ जणांचा करोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. करोनाचा वेग मंदावण्याचे हे संकेत आहेत.
संपूर्ण देशात केरळ पाठोपाठ महाराष्ट्रात करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या जास्त आहे. महाराष्ट्रात आठ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशातील करोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन पंतप्रधान मोदींनी काल रात्री देशाला उद्देशून केलेल्या भाषणात संपूर्ण देशात २१ दिवसांसाठी लॉकडाउनची घोषणा केली. इटली, स्पेन, इराणमध्ये आज करोना व्हायरसमुळे जी स्थिती निर्माण झाली आहे, तशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज