मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग।
ज्या मुलासाठी आईने रक्ताचे पाणी केले, त्याच मुलाने आणि सुनेने ६४ वर्षीय वृद्ध आईला घराबाहेर हाकलल्याची धक्कादायक घटना मंगळवेढ्यातील चोखामेळानगरमध्ये घडली आहे.
‘मुलगा व्हावा’ म्हणून समाजात नवस सायास केले जातात, मात्र याच मुलाने आईला बेघर करून माणुसकीला काळीमा फासला आहे.
विशेष म्हणजे, मंगळवेढा पोलिसांनी या वृद्धेच्या आक्रोशाकडे दुर्लक्ष केल्याने आता न्यायासाठी या मातेने थेट सोलापूरचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे उंबरठा झिजवला आहे.

नेमकी घटना काय?
सुरेखा सिद्राम नवगिरे (वय ६४) असे या पीडित वृद्ध मातेचे नाव आहे. पतीच्या निधनानंतर त्या चोखामेळानगर येथील स्वतःच्या घरात राहत होत्या.
मात्र, मुलगा प्रशांत नवगिरे आणि सून सरुबाई नवगिरे यांनी घरावर डोळा ठेवून ही जागा स्वतःच्या नावे करण्यासाठी तगादा लावला. १० जानेवारी २०२६ रोजी क्रूरतेचा कळस गाठत, या दोघांनी ६४ वर्षांच्या वृद्ध आईला हाताला धरून ढकलत घराबाहेर काढले.
तीन महिन्यांपासून आश्रयासाठी वणवण
गेल्या तीन महिन्यांपासून ही वृद्ध महिला जिथे जागा मिळेल तिथे आश्रय घेत आहे. बी.पी. आणि शुगरसारख्या आजारांनी ग्रासलेल्या या मातेची प्रकृती खालावत चालली आहे, मात्र पोटच्या गोळ्याला तिची दया आली नाही. समाजात या घटनेमुळे तीव्र संताप व्यक्त होत असून, “असला कसला हा कलियुगी मुलगा?” असा प्रश्न विचारला जात आहे.

वृद्ध महिलेने न्यायासाठी मंगळवेढा पोलीस ठाण्यात अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. मात्र, तक्रार देऊनही ठोस कारवाई झाली नाही. तपासिक अंमलदार यांनीही याकडे दुर्लक्ष केले.
केवळ अदखलपात्र गुन्हे दाखल करून पोलिसांनी हात झटकले आहेत. गरिबांना पोलीस ठाण्यात न्याय मिळत नाही का? असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे.

मंगळवेढ्यात न्याय न मिळाल्याने सुरेखा नवगिरे यांनी सोलापूरचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची भेट घेऊन लेखी तक्रार दिली. एसपींच्या कार्यालयातून तातडीने पोलीस निरीक्षक बोरीगिड्डे यांना फोन करून कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
या प्रकरणाची दखल आता राज्याचे गृहमंत्री, कोल्हापूर परिक्षेत्राचे आयजी आणि सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. आता तरी या वृद्ध मातेला स्वतःचे घर आणि न्याय मिळणार का? की पोलिसांची हीच उदासीनता कायम राहणार? याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज










