मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
आढीव (ता. पंढरपूर) येथील एका महिलेचा प्रसुती दरम्यान चुकीच्या गटाचा रक्त पुरवठा झाल्याने मृत्यू झाला आहे. या प्रकरणी रक्त पुरवठा करणारे स्वामी समर्थ ब्लड स्टोरेज सेंटर शुक्रवारी शासनाने बंद केले आहे. मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आरती चव्हाण (वय २५) असे आहे.

आढीव गावातील आरती चव्हाण ही महिला प्रसूतीसाठी मोहिते हॉस्पिटल येथे दाखल झाली होती. प्रसुती दरम्यान त्यांना रक्त देणे गरजेचे होते. यासाठी नातेवाईकांनी स्वामी समर्थ ब्लड स्टोरेज सेंटर येथून रक्त आणले.

मात्र हे रक्त देत असताना स्वामी समर्थ ब्लड स्टोरेज सेंटरच्या टेक्निशियनने रुग्णाचे रक्त आणि पिशवीतील रक्ताचे व्यवस्थित क्रॉस मॅच केले नाही. वास्तविक पाहता वैद्यकीय क्षेत्राच्या नियमांनुसार दोन्ही रक्तातील विसंगतता योग्यरित्या तपासली नाही. त्यामुळे रुग्णाचा ब्लड ग्रुप हा वेगळा असताना रुग्णाला ओ निगेटिव्ह रक्तपुरवठा केला.
मोहिते हॉस्पिटलमध्ये २ डिसेंबरला संध्याकाळी साडेसात वाजता सदर रुग्णाला हे रक्त पुरवण्यात आले. त्यानंतर काही तासांनी रुग्णाला प्रसुती वेदना होत असताना लघवीवाटे रक्त बाहेर पडू लागले.

ही बाब डॉक्टरांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी प्रसुतीची शस्त्रक्रिया थांबवून रुग्णाला पुढील उपचारासाठी सोलापूरला घेऊन जाण्याचा सल्ला नातेवाईकांना दिला. सोलापूरमध्ये देखील रुग्णाने उपचाराला योग्य प्रतिसाद न दिल्याने रुग्णाचा मृत्यू झाला.

रक्त साठवणूक केंद्राचे कामकाज बंद
तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सर्व अहवाल पुणे विभागीय आयुक्त जी. डी. हुकरे यांना पाठविले. त्यांनी स्वामी समर्थ ब्लड स्टोरेज सेंटर बंद करण्याचे आदेश दिले. या आदेशात म्हटले आहे की, रक्त घटक वितरित करताना ते रुग्णाच्या रक्तासोबत मॅच आहे किंवा कसे याबाबत योग्य प्रकारे क्रॉस मॅचिंग केलेले आढळून येत नाही. ती अत्यंत गंभीर बाब आहे. सबब जनआरोग्य व जनसंस्थांच्या दृष्टिकोनातून आपले रक्त साठवणूक केंद्राचे कामकाज पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात यावे.

अन्न व औषध प्रशासनाने पावले उचलली
ही बातमी समजताच अन्न व औषध प्रशासनाने तत्काळ पावले उचलली. सोलापूरच्या अधिकाऱ्यांनी मोहिते हॉस्पिटलमधील डॉ. पवन कुमार मोहिते यांच्यासह त्यांच्या सर्व डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवले.

तसेच स्वामी समर्थ ब्लड स्टोरेज सेंटरचे प्रमुख डॉक्टर गजानन बागल यांचा देखील जबाब नोंदवला. या स्टोरेज सेंटरच्या एका कर्मचाऱ्याने इमर्जन्सी असल्याने फक्त सलाईन मॅच केले. विसंगतता तपासली नसल्याची चूक आपल्या जबाबामध्ये मान्य केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













