मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
कोरोना महामारीला पाच वर्षं पूर्ण झाल्यानंतर आता पुन्हा एकदा एका नव्या व्हायरसमुळे जगात भीतीचं वातावरण तयार झालंय. चीनमध्ये एचएमपीव्ही व्हायरसचं संक्रमण खूप वाढल्याचं वृत्त आहे.
भारतातही या विषाणूच्या प्रादुर्भाव झालेले रुग्ण आढळू लागले आहेत. मात्र यामुळे कोरोनासारखी महामारीची परिस्थिती येईल का, तसं झाल्यास आपल्याकडे आरोग्य यंत्रणेची किती तयारी आहे, याबाबत बिर्ला रुग्णालयातील इंटर्नल मेडिसीन कन्सल्टंट डॉ. तुषार तायल यांनी माहिती दिली आहे.
कोरोना महामारीची सुरुवात चीनमधून झाल्यामुळे चीनमधील कोणत्याही आजाराच्या प्रादुर्भावाबाबत सतर्क राहण्याची भूमिका जगभरातील आरोग्य यंत्रणा घेतात. आता चीनमध्ये एचएमपीव्ही या विषाणूचं संक्रमण वाढताना दिसत आहे.
यामुळे चीनमधील रुग्णालयांमध्ये जागा अपुरी पडत असल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर फिरतायत. एमएमपीव्ही अर्थात ‘ह्युमन मेटान्युमोव्हायरस’ या विषाणूचा प्रादुर्भाव झालेले दोन रुग्ण भारतातही आता आढळले आहेत. त्यामुळे देशातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
व्हायरसशी कसं लढायचं?
श्वसनासंदर्भातील दैनंदिन तपासणीदरम्यान कर्नाटकात एचएमपीव्हीचे दोन रुग्ण आढळले. चीनमधून आलेल्या विषाणूच्या प्रादुर्भावाचेच हे रुग्ण असल्याचं सर्वांना वाटत आहे. याची सत्यता पडताळणी अजून झाली नसली, तरी देशातील एकदर वातावरण मात्र भीतीनं भरून गेलं आहे.
या विषाणूचा प्रादुर्भाव भारतात वाढला, तर काय होणार?, त्याच्याशी कसं लढता येईल? असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात उपस्थित होत आहेत. त्या संदर्भात बिर्ला रुग्णालयातील इंटर्नल मेडिसीन कन्सल्टंट डॉ. तुषार तायल यांनी माहिती दिली आहे.
चीनमधील परिस्थिती खरी?
डॉ. तुषार तायल म्हणाले की, चीनमधील परिस्थितीच्या सत्यतेविषयी आत्ताच काही सांगता येणार नाही, मात्र हा विषाणू नवा नसून 2001 मध्येच तो आला आहे. हा विषाणू श्वसनाशी संबंधित असून फुफ्फुसांमध्ये जाऊन तो समस्या निर्माण करतो. सध्या श्वसनाशी संबंधित अनेक विषाणू जगात आहेत. त्यापैकी बहुतांश विषाणू आपल्या शरीरात गेल्यावर आपोआपच नष्ट होतात किंवा आपली रोगप्रतिकारकशक्ती त्यांना नष्ट करते.
काही विषाणू आपल्या शरीरासाठी त्रासदायक ठरतात, मात्र बहुतांश विषाणूंमुळे आपल्याला फारसा काही त्रास होत नाही. केवळ सर्दी-खोकला असे किरकोळ आजार होतात. अशा सगळ्या विषाणूंमध्ये फ्लूसदृश लक्षणं आढळतात. एचएमपीव्ही विषाणूचा प्रादुर्भाव प्रामुख्याने लहान मुलं आणि वृद्धांमध्ये होतो. बहुतांश लोकांमध्ये हा आजार आपोआप बरा होतो. नाहीतर किरकोळ औषधांनी तो बरा होतो. अगदी काहीच लोकांमध्ये आजाराची तीव्रता जास्त असते. अर्थात अशा व्हायरल आजारांवर कोणतंही औषध उपलब्ध नाही. केवळ स्वाईन फ्लूकरता औषध दिलं जातं.
व्हेंटिलेटर वापरण्याची गरज नाही
या नव्या विषाणूमुळे कोरोनासारखी परिस्थिती उद्भवू शकते का आणि तशी ती उद्भवलीच, तर आपली आरोग्य यंत्रणा त्याकरता तयार आहे का? असा प्रश्न अनेकांना पडतो आहे. डॉ. तुषार तायल म्हणाले, कोरोनानंतर आपण सावरलो आहोत. अशा प्रकारच्या आजारांशी कसं लढायचं याचं ज्ञान आता आपल्याला मिळालं आहे. कोरोनाच्या तुलनेत आता रुग्णांची संख्या वाढली तर त्याला कसं सामोरं जायचं हे आपल्याला माहीत आहे. आता रुग्णालयांमध्ये चांगल्या सुविधा आहेत. दुसरीकडे एचएमपीव्ही आजाराची लक्षणं तितकीशी धोकादायक नाहीत. खूप कमी वेळा यात व्हेंटिलेटर वापरण्याची गरज भासू शकते.
व्हायरसशी लढण्याकरता आरोग्ययंत्रणा सज्ज
या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे कोरोनासारखी स्थिती होऊ शकते का हा खरा प्रश्न आहे. मात्र त्याबाबत नेमकं काही सांगता येत नाही. हा विषाणू नवा नाही, तो आधीपासूनच जगात आहे. त्यामुळे आता या विषाणूमुळे कोरोनासारखी महामारी येण्याची शक्यता फारच कमी आहे. एचएमपीव्ही विषाणूच्या प्रादुर्भावाबाबत आत्ताच नेमकं काही सांगता येत नसलं तरी त्याच्याशी लढण्याकरता आरोग्ययंत्रणा सज्ज असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज