टीम मंगळवेढा टाईम्स।
महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे फडणवीस आणि शिंदे यांच्यातील मुख्यमंत्रिपदासाठीची लढत संपली असली तरी मंत्रिमंडळ आणि मंत्र्यांची नावे निश्चित झालेली नाहीत.
भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कोट्यातून किती मंत्रिपदे दिली जाणार आणि कोणते खाते कोणाला मिळणार, याबाबतचे चित्र स्पष्ट झालेले नाही. यातच आता नव्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीची तारीख समोर आली आहे. यात हा सस्पेंस उघडणार आहे.
नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी १३ डिसेंबरला होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राजभवनात राज्यपाल नव्या मंत्र्यांना शपथ देणार आहेत. कालच्या बैठकीत १३ तारखेला शपथविधी घेण्यावर चर्चा झाली. या चर्चेत १३ डिसेंबर या तारेखेवर एकमत झाल्याची माहिती मिळाली आहे. तसेच मंत्रिमंडळात कोण-कोण असणार यावर देखील चर्चा तसेच निर्णय झाल्याची माहिती मिळाली आहे.
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना मंत्रिमंडळ विस्ताराबाबत कोणतीही संदिग्धता नसल्याचे सांगितले. तिन्ही घटक पक्ष मिळून निर्णय घेतील. यामध्ये कोणताही वाद नाही. नागपुरात अधिवेशन सुरू होण्यापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे.
याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या शपथविधीनंतर शिवसेनेचे आमदार भरत गोगावले आणि संजय शिरसाट यांनी या आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे संकेत दिले आहे.
विधानसभेचे हिवाळी अधिवेशन १६ डिसेंबरपासून नागपुरात सुरू होत आहे. त्याआधीच मंत्रिमंडळ स्थापन होईल, असे मानले जात आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात सत्तावाटपाबाबत एक फॉर्म्युला पुढे आला होता,
ज्यामध्ये पाच आमदारांमागे एक मंत्रीपद असेल, असे सांगण्यात आले होते. भाजपकडे एकूण १३२ आमदार आहेत, त्यामुळे त्यांना २२ ते २३ मंत्री मिळू शकतात. तसेच ५७ जागा जिंकणाऱ्या शिवसेनेला ११ ते १२ आणि ४१ जागा जिंकणाऱ्या राष्ट्रवादीला ८ ते १२ मंत्रीपदे मिळू शकतात.
मात्र, महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या वाटपाचा फॉर्म्युला अद्याप जाहीर झालेला नाही. अशा परिस्थितीत शिंदे आणि पवार कॅम्प आपली राजकीय ताकद वाढवण्यासाठी राजकीय खेळी करत आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप फ्रंटफूटवरून खेळण्यास सज्ज असून शिंदे, पवार हेही काही कमी नाहीत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज