टीम मंगळवेढा टाईम्स ।
भारत सरकारने तरुणांसाठी इंटर्नशिप योजना सुरू केली आहे. पीएम इंटर्नशिप योजना असं या योजनेचं नाव आहे. हा सरकारचा एक प्रकारचा पायलट प्रोजेक्ट आहे.
3 ऑक्टोबरला ही योजना सुरु करण्यात आली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2024-25 च्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली होती. दरम्यान, काय आहे पीएम इंटर्नशिप योजना? यामध्ये कोण अर्ज करू शकतो? ही योजना कधी सुरू होत आहे? जाणून घेऊयात याबाबतची सविस्तर माहिती.
पीएम इंटर्नशिप योजनेअंतर्गत 5 वर्षांत देशातील सुमारे 1 कोटी तरुणांना कंपन्यांमध्ये इंटर्नशिप दिली जाणार आहे. या योजनेत इंटर्नला दरमहा 5,000 रुपये दिले जातील. त्यापैकी 4500 रुपये भारत सरकार आणि 500 रुपये इंटर्नशिप देणारी कंपनी देईल.
या योजनेअंतर्गत निवडलेल्या उमेदवारांची यादी 26 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करता येणार आहे. 27 नोव्हेंबरपर्यंत कंपन्या अंतिम निवड करतील आणि 2 डिसेंबर 2024 पासून 12 महिन्यांसाठी इंटर्नशिप सुरू होईल.
1 कोटी तरुणांना इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करुन देणार
पीएम इंटर्नशिप योजनेअंतर्गत तरुणांना भारतातील टॉप 500 कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळेल. पाच वर्षांच्या कालावधीत 1 कोटी तरुणांना इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करून देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. सुरुवातीला इंटर्नशिपमध्ये सहभागी होण्यासाठी 6,000 रुपये एकरकमी आर्थिक सहाय्य दिले जाईल.
त्यानंतर एक वर्षासाठी प्रत्येक महिन्याला 5,000 रुपये आर्थिक सहाय्य दिले जाईल. इंटर्नशिप 12 महिन्यांसाठी असेल. चालू आर्थिक वर्षात 1.25 लाख इंटर्नशिप संधी उपलब्ध करून देण्याची योजना असल्याची माहिती सरकारी सूत्रांनी सांगितली आहे. यासाठी 800 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
बऱ्याच कंपन्यांनी या योजनेत स्वारस्य दाखवण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी प्रवास बुकिंग प्लॅटफॉर्म EaseMyTrip ने घोषणा केली होती की ते पुढील 3-6 महिन्यांत भारतभरातील 500 कंपन्यांना नियुक्त करणार आहेत.
12 ऑक्टोबरपासून नोंदणी सुरु होणार
10 ऑक्टोबरपर्यंत कंपन्या त्यांच्या गरजा आणि इंटर्नशिप पोस्ट्सची माहिती देतील. इच्छुक तरुण 12 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून www.pminternship.mca.gov.in या पोर्टलवर नोंदणी करु शकतील. शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांची यादी 26 ऑक्टोबरपर्यंत कंपन्यांना दिली जाईल.
हे पोर्टल प्रायोगिक तत्त्वावर नुकतेच सुरु करण्यात आले असले तरी, इंटर्नच्या अर्जासाठी पोर्टल उघडण्यासाठी सरकारने विजयादशमीचा शुभ दिवस निवडला आहे. आतापर्यंत 111 कंपन्या यात सामील झाल्या असून यामध्ये महाराष्ट्र, उत्तराखंड, तेलंगणा आणि गुजरात राज्यांचा समावेश आहे.
पीएम इंटर्नशिपसाठी पात्रता
पीएम इंटर्नशिप योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवाराची वयोमर्यादा 21 ते 24 वर्षे निश्चित करण्यात आली आहे. याशिवाय कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. सध्या औपचारिक पदवी अभ्यासक्रम किंवा नोकरी करणाऱ्यांना योजनेचा लाभ दिला जाणार नाही. तथापि, असे उमेदवार ऑनलाइन अभ्यासक्रम किंवा व्यावसायिक प्रशिक्षणाचा भाग बनू शकतात.
कंपन्या 27 नोव्हेंबरपर्यंत अंतिम निवड करणार
दरम्यान, निवडलेल्या उमेदवारांची यादी 26 ऑक्टोबरपर्यंत उपलब्ध असेल. कंपन्या 27 नोव्हेंबरपर्यंत अंतिम निवड करतील आणि इंटर्नशिप 2 डिसेंबर 2024 पासून 12 महिन्यांसाठी सुरू होईल.
इंटर्नशिपसाठी निवडलेल्या तरुणांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत विमा संरक्षण दिले जाईल. सरकार यासाठी प्रीमियम भरेल याशिवाय कंपन्या निवडलेल्या उमेदवाराला अतिरिक्त अपघात विमा देऊ शकतात.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज