टीम मंगळवेढा टाईम्स ।
गोव्यात पोलिसांना एकाच घरात दोन भावांचे मृतदेह आढळले होते. 29 आणि 27 वर्षीय भावांच्या निधनाची माहिती मिळाल्यानंतर परिसरात खळबळ माजली होती. पोलिसांनी प्राथमिक तपासात उपासमारीमुळे दोन्ही भावांचा मृत्यू झाल्याचं दिसत असल्याची माहिती दिली आहे. पोलिसांना घरात त्यांची आई बेशुद्ध अवस्थेत आढळली होती.
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुटुंब गेल्या अनेक दिवसांपासून दिवसाला फक्त एक खजूर खात होतं. मुलांचे वडील गारमेंट सेल्समन असून उपवासाववरुन मतभेद असल्याने ते कुटुंबापासून वेगळे राहत होते.
शवविच्छेदन अहवालात डॉक्टरांनी भावांच्या मृत्यूचे संभाव्य कारण म्हणून “गंभीर कॅशेक्सिया आणि कुपोषण” असल्याकडे लक्ष वेधलं आहे.
मोहम्मद झुबेर खान (29) आणि अफान खान (27) अशी मृत भावांची नावं आहेत. मोहम्मद झुबेर खान हा इंजिनिअर होता. त्यांची आई रुक्साना खान यांच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्या मानसिक आरोग्याच्या तपासणीसाठी त्यांना मानसोपचार आणि मानवी वर्तन संस्था (IPHB), गोवा वैद्यकीय महाविद्यालयात पाठवले जाणार आहे.
बुधवारी दोन्ही भावांचे वडील नाझीर खान त्यांच्या घरी पोहोचले होते. यावेळी त्यांनी दरवाजा ठोठावला असता आतून कोणीही उत्तर दिलं नाही. यानंतर नाझीर यांनी पोलिसांशी संपर्क साधला. “घर आतून बंद होतं.
आम्हाला एका खोलीत लहान मुलाचा मृतदेह आढळला. मोठा मुलगा दुसऱ्या खोलीत खाली जमिनीवर पडलेला होता. तसंच त्यांची आई बेडवर बेशुद्ध अवस्थेत होती,” अशी माहिती अधिकाऱ्याने दिली आहे. घरात पाणी, अन्न काहीच नव्हतं असंही त्यांनी सांगितलं.
पोलिसांनी सांगितल्यानुसार, नाझीर आठवड्याच्या सुरुवातीलाही पत्नी, मुलांना भेटण्यासाठी घरी गेले होते. पण पत्नी, मुलांनी त्यांना घरात प्रवेश करु दिला नव्हता. मुलांचे काका अकबर यांनी सांगितलं आहे की, त्यांचे पुतणे आणि आई काही महिन्यांपूर्वी घर सोडून गेले होते. त्यांनी सर्वांशी संपर्क तोडला होता. नाझीर यांचा उपवास आणि खाण्याच्या पद्धतीवरुन त्यांच्याशी वाद होत असल्याने वेगळे झाले होते.
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही भावांनी त्यांच्या बालपणातील जास्त काळ आईच्या गावी सिंधुदुर्गमध्ये घालवला होता. अकबर यांनी सांगितलं आहे की, झुबेर सावंतवाडीत इंजिनिअर म्हणून काम करत होता आणि अफान बी.कॉम पदवीधर होता. झुबेरचं लग्न झालं असून, त्याला दोन मुलंही आहेत. पण नंतर दोघे भाऊ पालकांसह मार्गोला गेले आणि तेव्हापासून बेरोजगार होते. झुबेरची पत्नी आणि मुलं त्यांच्यासह गेले नव्हते.
“दोन्ही भाऊ आपल्या आईच्या फार जवळ होते. पण कोणी खाणं का थांबवेल? कुटुंब बऱ्यापैकी सुस्थितीत होतं. दोघे भाऊ आणि त्यांची आई तणावाखाली होते की त्यांना मानसिक आरोग्याची समस्या होती हे मला माहीत नाही,” असं अकबर म्हणाले आहेत. पोलिसांनी सांगितलं आहे की, कुटुंबीयांनी त्यांना सांगितले की, झुबेर, अफान आणि रुक्साना दररोज फक्त एक खजूर खात होते.
नाझीर किराणा सामानासाठी लागणारे पैसे घराच्या एका छिद्रातून आत टाकत असत. परंतु गेल्या काही आठवड्यांपासून कुटुंबाने ते छिद्र बंद केलं होते. लोकांना आत जाण्यापासून रोखण्यासाठी त्यांनी घराच्या मुख्य दरवाजाजवळ काही फर्निचर देखील ठेवलं होते,” अशी माहिती अधिकाऱ्याने कुटुंबातील सदस्याच्या हवाल्याने दिली आहे. (स्रोत:Zee News)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज