टीम मंगळवेढा टाईम्स ।
खासदारकीच्या उमेदवारीवरून विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि प्रशांत परिचारक मोहिते-पाटील गटात तसेच आमदारकीच्या उमेदवारीवरून आपल्यात आणि आमदार समाधान आवताडे यांच्यात कोणतेही मतभेद नाहीत.
कार्यकर्त्यांमध्ये गावपातळीवर काही गोष्टी घडत असतात. उमेदवारीची मागणी करण्यात चुकीचे काही नाही.
खासदार श्री.निंबाळकर हे चांगले काम करत आहेत तथापि पक्ष जो निर्णय देईल, तो सर्वांना मान्य करावा लागेल, असे स्पष्ट करत लोकसभा निवडणुकीत सांगली, माढा आणि सोलापूर या तिन्ही जागी पुन्हा भाजपचे उमेदवार निवडून यावेत यासाठी आम्ही सर्वजण प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत, असे प्रतिपादन लोकसभा मतदार संघाचे भाजपचे क्लस्टर प्रमुख, माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी केले.
पत्रकारांनी पक्षातील स्थानिक मतभेदाच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना श्री. परिचारक म्हणाले, मंगळवेढा येथील एका कार्यक्रमातील आपल्या बोलण्याचा विपर्यास केला गेला. आमदार श्री.आवताडे आणि आपण अतिशय खेळीमेळीने एकत्र काम करतो.
कार्यकर्त्यांमध्ये काही वेळा मतभेद असतात. ते समजून घेऊन आम्ही काम करतो. पक्षाकरता एकदा नव्हे तर दोनदा आपण माघार घेतलेला कार्यकर्ता आहे. श्री.आवताडे यांना आपण आमदार केलेले आहे.
पक्षाच्या आदेशावरून तन, मन, धनाने आमच्या सर्व सहकाऱ्यांनी काम केले. नेते म्हणून आम्ही सर्वांनी मन मोठे करून पुढे गेले पाहिजे.
श्री. निंबाळकर आणि मोहिते पाटील यांच्या अनुषंगाने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना श्री. परिचारक म्हणाले, काही कारणामुळे गावपातळीवरील कार्यकर्त्यांना काही गोष्टी खटकतात, गटबाजी असते, लोकशाहीमध्ये या सगळ्या गोष्टी होत असतात.
परंतु आम्हा नेतेमंडळींमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. लोकांना अपेक्षा असते, कुणी मागणी करणे यात काही चूक नाही. तथापि श्री. निंबाळकर यांचे रिपोर्ट कार्ड चांगले आहे. वरिष्ठांनी देखील त्यांच्या कामाविषयी कौतुक केले आहे.
कॉरिडॉरबाबत उद्याप निर्णय नाही
पंढरपूर येथील प्रस्तावित कॉरिडॉरसंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना श्री. परिचारक म्हणाले, पंढरपूर येथील वाढती गर्दी लक्षात घेऊन कोणती कामे करायची, या विषयीची चर्चा सुरू आहे. मुंबईत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या कामांच्या विषयीचे सादरीकरण करण्यात आले. परंतु अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.
आम्ही स्थानिक लोकांच्या बरोबर आहोत. लोकांना त्रास होईल अशा पध्दतीचा कोणताही निर्णय शासनाकडून होणार नाही, याची दक्षता आम्ही घेत आहोत. मंदिर परिसरातील विकास आराखड्यातील रस्त्यांची कामे कधीना कधी होणारच आहेत. त्यात ज्या लोकांची दुकाने जातील त्यांना योग्य मूल्यांकन देऊन त्यांचे समाधान केले जावे, अशी आम्हा सर्वांची भूमिका आहे, असे परिचारक म्हणाले.
शहराऐवजी नदीच्या पलीकडे विकासकामे करावीत
पंढरपूर शहरा ऐवजी नदीच्या पलीकडे विकास कामे करावीत, चंद्रभागा नदीवर दोन, तीन पूल बांधावेत, अशा सूचना आम्ही केल्या आहेत. वाखरी ते पंढरपूर रस्त्याचे काम आता सुरू झाले आहे. पंढरपूर शहरात जड वाहतूक येऊ नये, नवीन रिंग रोड तयार व्हावा यासाठी अडनसोंड ते मुंढेवाडी नवीन पूल बांधण्यात यावा, यासाठी आपला पाठपुरावा सुरू आहे.
पंढरपूरसाठी नवीन पाणीपुरवठा योजना, उर्वरित ड्रेनेजसाठी सव्वाशे कोटीची योजना मंजूर व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत असे सांगून श्री. परिचारक यांनी देशातील प्रमुख तीर्थक्षेत्रांच्या बरोबरीने आपले पंढरपूर पुढे जावे यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले.(स्रोत:सकाळ)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज