टीम मंगळवेढा टाईम्स।
राज्य शासनाने एक रुपयात पंतप्रधान पिक विमा भरुन घेतला. खरिप पिकांचे नुकसान झाल्यामुळे मंडळनिहाय पिक व त्याची नुकसान भरपाई जिल्हा कृषी विभागाने जाहीर केले.
त्यानुसार जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पिक विमाधारक शेतकऱ्यांना २५ टक्के नुकसान भरपाई महिन्यात देण्याचे आदेश दिले.
या पिक विम्यात उडीद व मूग पेरणी केलेल्या शेतकऱ्यांनी पिक विमा भरले असले तरी त्याना नुकसान भरपाई मिळणार नाही.
कारण त्या पिकांचा हंगाम संपला असे गृहित धरण्यात आले असल्याचे सूत्रांनी सांगितले. महत्वाचे म्हणजे पेरण्यापूर्वीच पिक विमा जाहिर करणे अपेक्षित होते.
ज्या मंडळात, ज्या पिकांचे क्षेत्र घोषीत केले आहे त्या पिकास नुकसान भरपाई मिळेल. अन्य पिकांचा विमा भरला असला तरीही त्याची नुकसान भरपाई मिळणार नाही.
मका पिकाचा विमा माढा, पंढरपूर आणि करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळेल. या शिवाय इतर तालुक्यातील मका पेरणी केलेल्या-शेतकऱ्यांना पिक विमा भरला असला तरीही त्यांना नुकसान भरपाई मिळणार नाही.
कांद्याची नुकसान भरपाई सांगोला, मंगळवेढा आणि माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार नाही. पिक विमा मिळणार असला तरी ज्या मंडळात ज्या पिकांना जाहीर केला त्याच पिकांना देण्याचा निर्णय चुकीचा असल्याचे मत शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी व्यक्त केले आहे.
तूर सर्व तालुक्यात असले तरी मका, कांदा, बाजरी आणि सोयाबीन ही पिके सर्व तालुक्यात नाहीत. त्यामुळे पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे.
रब्बीसाठी तयारी : खरिप पिके वाया
गेल्यानंतर आता रब्बी पिकासाठी तयारी शेतकऱ्यांनी सुरु केले आहे. बाजरी, हरभरा, ज्वारी ही मुख्य पिके रब्बी हंगामात घेतली जात आहेत. त्यासाठी बाजारात बियाणे उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. खरिपाचे क्षेत्र रब्बीसाठी असल्याने रब्बीचे क्षेत्र वाढवून पेरणी होण्याची शक्यता आहे.
मंगळवेढा, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, सांगोला, बार्शी तालुक्यात रब्बीचे पिके घेतले जातात. त्यासाठी गणेशोत्सवानंतर रब्बीची पेरण्या सुरु होतील. रब्बीसाठी उपयुक्त हंगाम असल्याचे जाणकारांकडून सांगण्यात आले. मात्र उडीद व मूंग उत्पादकांत नाराजीचे सूर उमटले आहेत.
आता मंडळनिहाय जाहीर केलेल्या पिकांनाच मिळेल विमा
ज्या मंडळात ज्या पिकासाठी पिक विमा जाहीर केला त्यांच पिकासाठी विम्याची रक्कम देण्यात येईल. मूग आणि उडीद पिकांचा हंगामचा काळ संपल्याने त्या पिकास विम्यातून वगळ्यात आले आहे. सलग २१ दिवस पाऊस नसल्याच्या नोंदीनुसार पिकांचे नुकसान गृहीत धरण्यात आले. पिक विम्याचे २५ टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात भरण्याचे आदेश इन्शुरन्स कंपनीला देण्यात आले आहे.
कंपनीचा निर्णय अद्याप आम्हास कळाले नाही. त्यांनी शासनाकडे अपिल केल्याचे माहितीही नाही. कंपनीचे मत अधिकृतपणे कळालेले नाही. आता तर त्यांना महिन्यात रक्कम भरण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक दत्तात्रय गावसाने यांनी दिली.(स्रोत:दिव्य मराठी)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज