टीम मंगळवेढा टाईम्स।
महाराष्ट्रातील अंगणवाड्यांमध्ये जवळपास ३० हजार ४०० पदांची भरती केली जाणार आहे. सेविकासाठी आता दहावीऐवजी बारावी उत्तीर्णची अट असणार आहे.
मदतनीस व सेविकांची अंतिम निवड करण्याचा अधिकार तालुक्याच्या बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनाच असणार आहे.
आठ दिवसांत भरती प्रक्रियेला सुरवात होणार आहे. प्रत्येक गावांमधील एक ते सहा वर्षांपर्यंतच्या चिमुकल्यांना शाळेची गोडी निर्माण व्हावी, अक्षर, अंक ओळख व्हावी या उद्देशाने अंगणवाड्या सुरु करण्यात आहेत. राज्यात एक लाख दहा हजारांपर्यंत अंगणवाड्या असून आणखी वाढीव अंगणवाड्यांचा प्रस्ताव आहे.
अंगणवाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त असल्याने राज्य सरकारने ९ जानेवारीला पदभरतीला मान्यता दिली आहे.
पण, केंद्र सरकारच्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार सेविकांसाठी शैक्षणिक पात्रता दहावीऐवजी बारावी करण्यात येणार आहे. त्यासंबंधीचा शासन निर्णय तयार झाला असून त्याला अंतिम मान्यता मिळाल्यानंतर तात्काळ भरतीला सुरवात होणार आहे.
साधारणत: पुढील ८ दिवसांत भरती प्रक्रिया सुरु होईल. इच्छुक उमेदवारांना तालुक्याच्या बालविकास प्रकल्प कार्यालयात अर्ज करावे लागतील. त्यानंतर अर्जांची छाननी होऊन निकषांनुसार पात्र उमेदवारांची निवड केली जाईल.
तत्पूर्वी, मदतनीस महिलांना सेविका म्हणून पदोन्नती दिली जाणार असून त्याच्या याद्या तयार करण्यात आल्या आहेत. दरम्यान, राज्यभरात १४८ पर्यवेक्षिकांची देखील भरती केली जाणार आहे.
सोलापूर जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये ४२५ मदतनीस व २२५ सेविकांची पदे रिक्त आहेत. महापालिकाअंतर्गत दोन, नगरपालिकांमध्ये प्रत्येकी एक आणि ग्रामीणसाठी प्रत्येक तालुक्यात एक बालविकास प्रकल्प अधिकारी आहेत. त्यांच्या माध्यमातून आता रिक्त पदे भरली जाणार आहेत.
या भरतीत उच्चशिक्षित तरूणी, महिला अर्ज करतील. अध्यापनाचा अनुभव असलेल्यांचाही समावेश असणार आहे. त्यामुळे या पदभरतीत कोणतीही वशिलेबाजी चालणार नाही, असे महिला व बालविकास अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
निवडीची अशी असेल प्रक्रिया
अर्जदारांची यादी ग्रामपंचायतीत प्रसिद्ध होणार; सेविकांसाठी बारावी तर मदतनीससाठी सातवी उत्तीर्णची पात्रता
तालुक्याच्या बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडे उमदवाराने अर्ज करायचा अर्जासोबत शैक्षणिक पात्रता, अनुभव प्रमाणपत्र, जन्म दाखला अशी कागदपत्रे अर्जासोबत असावीत
शैक्षणिक पात्रता सारखीच असल्यास अध्यापनाचा अनुभव पाहिला जाईल. सर्वच उमेदवारांची शैक्षणिक पात्रता सारखी व अनुभवही नसेल तर जास्त वय असलेल्यास प्राधान्य असेल.
शैक्षणिक पात्रता, अनुभव, वय सर्व बाबी सारख्या असल्यास लॉटरी पद्धतीने उमेदवार निवडला जाईल.
बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी निवड केलेल्यांची व प्राप्त अर्जदारांची यादी शेजारील तालुक्यातील अधिकाऱ्यांकडून पडताळणी हाईल.(स्रोत:सकाळ)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज