टीम मंगळवेढा टाईम्स ।
श्रीलंकेने आशिया चषक २०२२ स्पर्धा जिंकली. स्पर्धेचा पहिलाच सामना गमावल्यानंतर श्रीलंकेने जबरदस्त कमबॅक केले आणि सलग ५ विजय मिळवून जेतेपदाला गवसणी घातली.
आशिया चषक 2022 चा अंतिम सामना पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्या दरम्यान खेळला गेला. दुबई येथे झालेल्या या सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानवर वर्चस्व गाजवत 23 धावांनी विजय मिळवत आपल्या नावे केला.
याचबरोबर श्रीलंकेने पाचव्यांदा आशिया चषक जिंकण्याची कामगिरी केली. भानुका राजपक्षे व वनिंदू हसरंगा हे श्रीलंकेच्या विजयाचे नायक ठरले.
दुबई येथील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
त्याचा हा निर्णय युवा वेगवान गोलंदाज नसीम शहा याने पहिल्या षटकात योग्य ठरवला. चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या कुसल मेंडीसचा त्याने शून्यावर त्रिफळा उडविला.
दुसरा सलामीवीर पथुम निसंका 8 व धनुष्का गुणथिलका एका धावेवर माघारी परतले. चांगल्या लयीत दिसत असलेल्या धनंजय डी सिल्वाला इफ्तिखारने 28 धावांवर बाद केले. कर्णधार दसून शनाका हा या अंतिम सामन्यात अपयशी ठरला.
त्यानंतर आलेल्या वनिंदू हसरंगाने भानुका राजपक्षेला साथ देत वेगवान फलंदाजी केली. दोघांनी शानदार अर्धशतकी भागीदारी करत संघाला शतकी मजल मारून दिली.
हसरंगा 21 चेंडूवर 36 धावांची खेळी करत बाद झाला. हसरंगा बाद झाल्यानंतरही राजपक्षेने आपले आक्रमण कायम ठेवले व 35 चेंडूवर स्पर्धेतील आपले पहिले अर्धशतक पूर्ण केले.
त्याने अखेरपर्यंत नाबाद राहत 45 चेंडूवर 45 चेंडूवर नाबाद 71 धावा केल्या. पाकिस्तानसाठी वेगवान गोलंदाज हारिस रऊफने सर्वाधिक तीन बळी मिळवले.
विजेतेपदासाठी 171 धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या पाकिस्तानला कर्णधार बाबर आझमच्या रूपाने पहिला धक्का बसला. पुढच्या चेंडूवर फखर झमानही शून्यावर बाद झाला.
त्यानंतर मोहम्मद रिझवान व इफ्तिखार अहमद यांनी पाकिस्तानचा डाव सावरला. दोघांनी दहा षटकात 71 धावा जोडल्या. इफ्तिखार 32 व नवाज 6 धावांवर माघारी गेल्याने पाकिस्तानचा संघ अडचणीत सापडला.
मात्र, सलामीला आलेल्या रिझवानने 47 चेंडूत अर्धशतक केले. परंतु, वनिंदू हसरंगाने रिझवान, आसिफ अली व खुशदील शाह यांना एकाच षटकात बाद करत सामना श्रीलंकेच्या बाजूने झुकवला.
भारतानंतर श्रीलंका दुसऱ्या क्रमांकावर, सहावेळा आशिया चषक विजेता
आतापर्यंत भारताने विक्रमी सात वेळा आशिया कप जिंकला आहे. भारतानंतर श्रीलंकेने सहावेळा आशिया कप जिंकून दुसऱ्या क्रमांकावर आपले नाव कोरले आहे. आतापर्यंत श्रीलंकेने १९८६, १९९७, २००४, २००८, २०१४ आणि २०२२ साली आशिया चषकावर आपले नाव कोरले आहे.
सर्वाधिकवेळा स्पर्धा जिंकण्याचा बहुमान भारताला
आशिया चषकात आतापर्यंत सर्वाधिक सात वेळा ही स्पर्धा भारताने जिंकली आहे. १९८४ मध्ये झालेल्या आशिया चषकाचा पहिला हंगाम भारताने जिंकला होता. श्रीलंकेने १९८६ मध्ये विजेतेपद पटकावले आणि त्यानंतर भारताने १९८८, १९९१ आणि १९९५ मध्ये सलग तीन वेळा विजेतेपद पटकावले. यानंतर श्रीलंकेचा संघ १९९७ मध्ये आशिया कपचा विजेता ठरला.
पाकिस्तानला २००० साली पहिल्यांदा विजेतेपद मिळवण्याची संधी मिळाली. यानंतर २००४ आणि २००८ मध्ये श्रीलंकेचा संघ विजेता ठरला होता. यानंतर २०१० मध्ये भारताने विजेतेपद पटकावले होते.
२०१२ मध्ये पाकिस्तान संघाने दुसऱ्यांदा आशिया कप जिंकला. २०१४ मध्ये श्रीलंका आणि २०१६ आणि २०१८ मध्ये भारताने विजय मिळवला होता. भारताने ७ वेळा (१९८४, १९८८, १९९०-९१, १९९५, २०१०, २०१६, २०१८) आशिया कप विजेतेपद पटकावले आहे.
पाकिस्तान केवळ दोनदाच विजयी
आशिया चषकाच्या आतापर्यंतच्या इतिहासात पाकिस्तानला केवळ दोनदाच ही स्पर्धा जिंकता आली आहे. २०१२ पूर्वी त्याने २००० मध्ये ही स्पर्धा जिंकली होती. तर दोनदा तो उपविजेता ठरला आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज