टीम मंगळवेढा टाईम्स।
सोलापूर जिल्ह्यात बार्शीसह संपूर्ण राज्यातील नागरिकांना सुमारे ४० कोटींचा गंडा घालणाऱ्या विशाल फटे याला बार्शीच्या विशेष न्यायालयाने दणका दिला आहे.
या प्रकरणातील संशयित असलेले त्याची पत्नी आणि आईचा अटकपूर्व जामीन अर्ज बार्शी न्यायालयाने फेटाळून लावला आहे, त्यामुळे फटेच्या अडचणीत वाढ झाली आहे.
शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी प्रलोभने दाखवून विशाल फटे यांनी बार्शीसह राज्यभरातील नागरिकांकडून कोट्यवधी रुपये गोळा केले आहेत. त्यासाठी त्याने बार्शीसह पुण्यातही कार्यालये थाटली होती. यामध्ये अनेक बड्यांची नावेही आहेत.
या फसवणूक प्रकरणी विशाल फटे याच्यावर जानेवारी २०२२ मध्ये बार्शी पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. फिर्यादी दिपक आंबुरे यांच्या फिर्यादीवरुन मुख्य सूत्रधार विशाल फटे याच्यासह त्याची
पत्नी राधिका फटे, वडील अंबादास फटे, भाऊ वैभव फटे व अलका फटे (सर्वजण रा.कर्मवीर हौसिंग सोसायटी, अलिपूर रोड, बार्शी) यांच्याविरुध्द 14 जानेवारी रोजी गुन्हा दाखल झाला होता.
आतापर्यंत १४० गुंतवणूकदारांची सुमारे ४० कोटींपर्यंतची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी पत्नी व आईचा अटकपूर्व जामीन अर्ज विशेष न्यायालयाचे न्यायाधिश एल. एस. चव्हाण यांनी फेटाळला.
संशयित आरोपी म्हणून विशाल फटे आणि त्याचे वडील अंबादास फटे या दोघांनाच पोलिसांनी आजपर्यंत अटक केली आहे. विशालची पत्नी राधिका फटे, त्याची आई अलका फटे यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता.
त्यांच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादात ‘संशयित आरोपी महिलांच्या खात्यावरुन कसलाही व्यवहार झालेला नाही. त्यांचा या प्रकरणाशी कोणताही संबंध नाही, त्यामुळे त्यांना जामीन मंजूर करावा,’ अशी मागणी केली होती.
दुसरीकडे, संशयित महिला आरोपी ही मागील चार ते पाच महिन्यांपासून फरार आहे. पोलिस कोठडीशिवाय या प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने होणार नाही.
फसवणुकीतील रक्कमेची व्याप्ती सुमारे चाळीस कोटींपेक्षा अधिक आहे. तसेच, आरोपींनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी सेबीची पूर्व परवानगीही घेतलेली नाही, असा युक्तिवाद गुंतवणूकदारांच्या वतीने न्यायालयापुढे करण्यात आला.
गुंतवणुकदारांच्या वतीने तपास यंत्रणा करत असलेल्या कामावरही सशंय व्यक्त करण्यात आला. फिर्यादी विधिज्ञांचा युक्तिवाद ग्राह्य धरून अलका व राधिका फटे यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला.
गुंतवणूकदारांच्या वतीने ॲड. सचिन झालटे, ॲड. श्याम झालटे, विशेष सरकारी वकील ॲड. प्रदीप बोचरे यांनी युक्तिवाद केला, तर संशयित आरोपीच्या वतीने ॲड. प्रशांत एडके यांनी युक्तिवाद केला.(स्रोत:सरकारनामा)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज