टीम मंगळवेढा टाईम्स ।
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत आंधळगाव प्रादेशिक पाणीपुरवठा-योजनेमध्ये असलेल्या अकरा पैकी आठ गावांनी योजनेचे पाणी घेण्यास नकार दिला आहे.
दरम्यान, भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना अद्याप पूर्ण कार्यक्षमतेने कार्यान्वित झाली नसून, एक कोटीच्या आसपास विज बिल थकल्याने सध्या ही योजना बंद आहे.
त्यामुळे ही योजना सुरू करण्यासंदर्भात पुढील आठवड्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याचे आमदार अवताडे यांनी सांगितले.
उन्हाळ्याची दाहकता वाढत असल्यामुळे संभाव्य पाणी टंचाई जाणवणार हे निश्चित झाले आहे. त्यामुळे आतापासूनच प्रत्येक गावोगावी टंचाई काळात कशा पद्धतीने पाणीपुरवठा करायचा
या संदर्भात आमदार समाधान आवताडे यांनी ग्रामीण पाणीपुरवठा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, सरपंच ग्रामसेवक व पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.
यावेळी आंधळगाव प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेमधील लक्ष्मी दहिवडी, आंधळगाव या दोनच गावांनी फक्त टंचाईच्या कालावधीत मार्च, एप्रिल, मे, जून असे चारच महिने पाणी घेण्याची अनुकूलता दाखवली.
त्याचबरोबर मल्लेवाडी या गावाने ही योजना सुरळीत सुरू झाली तर टंचाई काळात चार महिने पाणी घेऊ असे सांगितले.
पाणी घेण्यास ‘या’ गावांनी दिला नकार
महमदाबाद.शे, कचरेवाडी, अकोला, मारापुर, घरनिकी, देगाव, ढवळस, धर्मगाव या गावांनी पाणी घेण्यास नकार देत आम्हाला या योजनेमधून वगळून तसे पत्र द्या व गावपातळीवर जल जीवन मिशन अंतर्गत नवीन योजना द्या अशी मागणी केली.
अनेक गावांमध्ये अद्यापही पाणीच गेले नसताना, त्या गावांना पाणीपट्टी व वीज बिल आकारणी केल्याच्या नोटिसा मिळाल्याचे सांगण्यात आले. ही योजना पूर्ण झाली नसतानाही गुपचूप शिखर पाणी समिती स्थापन करून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने जबाबदारी झटकली आहे.
तरी शिखर समिती बरखास्त करून ही योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणनेच चालवावी अशी भूमिका या योजनेतील समाविष्ट गावच्या सर्व सरपंचांनी घेतली यावर आमदार समाधान आवताडे यांनी तात्काळ निर्णय घेऊन या योजना सुरू करा. अन्यथा तुम्हाला चौकशीला सामोरे जावे लागेल असा इशारा दिला.
पुढील आठवड्यात आणखी एक बैठक आयोजित करून योजना लवकरात लवकर सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले.
यावेळी या बैठकीला पंचायत समितीचे माजी सभापती प्रदीप खांडेकर , सुधाकर मासाळ , पंचायत समिती सदस्य तात्या मस्के , माजी उपसभापती सुरेश ढोणे , शशिकांत चव्हाण येताळा भगत , धनंजय पाटील , सचिन शिवशरण , बीरा लवटे नाथा काशीद , दत्ता साबणे , भारत गरंडे , मंजुळा कोळेकर , ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे दीपक कोळी , राजकुमार पांडव , महाराष्ट्र जीवन प्राधिकरण चे सुनील देशपांडे , पंचायत समितीचे विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर साळुंके यांचेसह अधिकारी पदाधिकारी त्या त्या गावचे सरपंच ग्रामसेवक उपस्थित होते.
दोन गावांची योजनेत समाविष्ट करून घेण्याची मागणी
मंगळवेढा शहरानजीक असलेल्या चोखामेळा नगर व दामाजी नगर या दोन गावांनी आम्हाला या योजनेत समाविष्ट करून बारमाही पाणी द्या अशी मागणी केल्यामुळे आता या योजनेमध्ये दामाजी नगर चोखामेळा नगर लक्ष्मी दहिवडी व आंधळगाव या चारच गावा पुरती ही योजना मर्यादित राहणार आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज