टीम मंगळवेढा टाईम्स ।
एकतर उतारा कमी त्यातच उसाचे पैसे देण्यात हात आखडता घेतल्याने जिल्ह्यातील पाच साखर कारखाने ‘ रेड ‘ मध्ये गेले आहेत.
नियमित एफआरपी नुसार १०० टक्के रक्कम देऊन सात कारखान्यांनी शेतकऱ्यांना आधार दिला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील ३३ साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सध्या सुरू आहे. साडेचार महिन्यांपासून सुरू असलेल्या ऊस गाळपाची रक्कम कारखान्याकडून वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत.
शेतकरी संघटना ‘एफआरपी’ चुकती न करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करण्याची मागणी साखर आयुक्ताकडे करत आहेत तशा नोटीस कारखान्याला दिल्या जात असल्या तरी कारखाने पैसे देताना दिसत आहे.
जिल्ह्यातील पाच कारखान्यांनी ५० टक्केही पैसे दिले नाहीत. यामध्ये संत दामाजी , सिद्धनाथ , मातोश्री लक्ष्मी भैरवनाथ लवंगी व भैरवनाथ आलेगाव यांचा समावेश आहे.
एफआरपी देण्यात सर्वांत मागे संत दामाजी ( ४० टक्के ) सिद्धनाथ ( ४३ टक्के ), मातोश्री लक्ष्मी ( ४३ टक्के ) हे कारखाने आहेत. भैरवनाथ कारखान्याने ५० टक्के रक्कम दिली आहे. या पाच कारखान्यांकडे १७४ कोटी ५४ लाख रुपये इतकी थकबाकी आहे.
श्री.पांडुरंग श्रीपूर, सहकारमहर्षी शंकरराव मोहिते – पाटील , विठ्ठलराव शिंदे पिंपळनेर व करकंब , विठ्ठल कॉर्पोरेशन , गोकुळ व धाराशिव सांगोला कारखाने नियमित एफआरपी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करत आहेत. या सात कारखान्यांनी ८५६ कोटी ५१ लाख रुपये एफआरपीपोटी दिले आहेत.(स्रोत:लोकमत)
१७५ मे . टन गाळ, उतारा ९ .१७ टक्के
लोकनेते बाबूराव आण्णा पाटील , सासवड माळी शुगर, सिद्धेश्वर सोलापूर , जकराया, औदुंबर पाटील, युटोपियन, गोकुळ माऊली, ओंकार चांदापुरी , सीताराम महाराज, बबनराव शिंदे व सहकार शिरोमणी वसंतराव काळे या साखर कारखान्यांनी ८० टक्क्यांपेक्षा अधिक रक्कम दिली आहे.
संत कुर्मदास, भीमा सहकारी, विठ्ठल रिफायनरी, लोकमंगल बीबीदारफळ , लोकमंगल भंडारकवठे, इंद्रेश्वर , भैरवनाथ विहाळ, जयहिंद व मकाई साखर कारखान्याने ६० टक्क्यांपेक्षा अधिक रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील ३३ साखर कारखान्याचे गाळप १७५ लाख मेट्रिक टन इतके झाले असून , साखर उतारा मात्र ९ .१७ टक्के इतकाच आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज