टीम मंगळवेढा टाईम्स ।
राज्यातील कोरोना स्थिती पाहता जिल्ह्यातील नऊ नगरपरिषदांवर प्रशासक नेमण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी काढले आहेत. निवडणूक आयोगाने कोविडच्या स्थितीमुळे निवडणूका अशक्य असल्याने राज्य शासनाला या नगरपरिषदांवर प्रशासक नेमण्याची सुचना केली होती.
मंगळवेढा नगरपालिकेतील पार्लमेंटरी बोर्डाची मुदत संपली असू असून त्यामुळे पदाधिकारी, नगरसेवकांवर मर्यादा आल्या आहेत. कालपासून प्रशासकीय राजवट लागू करण्यात आली आहे.
प्रशासक म्हणून उपविभागीय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
काही नगरसेवकांनी पाच वर्षे प्रशासनातील काही कर्मचार्यांना टार्गेट केले होते. पाच वर्षांची मुदत संपल्यानंतर प्रशासनाची, सर्वसामान्य कर्मचार्यांची नगरसेवकांनी आवर्जून दखल घेतली.
सोलापूर जिल्ह्यातील एकूण 9 नगरपरिषदेचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. त्यामुळे या नगरपरिषदांच्या निवडणूका घेण्याची जय्यत तयारी सुरु झाली होती. सर्वच राजकीय पक्षांनी देखील निवडणुक लढवण्याच्या दृष्टीने मोर्चेबांधणी केली होती.
मुदत संपल्यानंतर प्रशासक येणार आणि याच कर्मचार्यांची आता आपल्याला गरज भासणार हा हेतू ठेवून काही नगरसेवक वागत होते. त्यांचा हा कृत्रिमपणा कर्मचार्यांनीही ओळखला.
काही नगरसेवक आणि पदाधिकार्यांनी प्रशासनाला सोबत घेवून चांगल्या पध्दतीने काम केले. नगरपालिकेत काम करताना प्रशासनाला येणार्या अडचणी ओळखून पदाधिकारी, नगरसेवकांनी अधिकारी, कर्मचार्यांना समजावूनही घेतले.
मात्र, ज्यांनी प्रशासनाला जाणीवपूर्वक टार्गेट केले, त्यांनी थोडी धास्ती घेतल्याचेही चित्र नगरपालिकेत पहायला मिळाले. मुदत संपण्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवेढा पालिकेत भावनिक वातावरण निर्माण झाले होते.
नगर पालिकेतील सदस्यांची मुदत संपल्याने नगरसेवक तसेच पदाधिकार्यांच्या अधिकारावर मर्यादा आल्या आहेत. नगरसेवक पद असले तरी त्यांना पूर्वीसारखा आपल्या अधिकाराचा वापर करता येईल का, याची चर्चा सध्या नगरसेवकांमध्ये सुरु आहे.
नगरपालिकेत प्रशासकीय राजवट लागू झाली आहे. निवडणूक कधी लागेल आणि नवी बॉडी कधी अस्तित्वात येईल हे तूर्त कुणीच सांगू शकत नाही. त्यामुळे पुढील काळात नगरसेवकांना येणार्या प्रशासकासोबत जुळवून घ्यावे लागणार आहे.
मनमानी करणारे, आडमुठी भूमिका घेणार्यांसाठी हा काळ कठिण असून उट्टे निघण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने काही बदल होवू शकतात.
शहरातील पायाभूत सुविधा, नागरिकांचे प्रश्न नगरसेवकांविना तडीस लावण्याचे दिव्य प्रशासकाला पार पाडावे लागणार आहे. आगामी निवडणुकीच्यादृष्टीने कामकाज सुरळीत पार पाडवे लागणार आहे.
सध्या मंगळवेढ्यातील राजकीय वातावरण ‘हॉट’ आहे. त्यातच मुदत संपल्याने यापुढील सर्व जबाबदारी प्रशासकाची राहणार आहे. आंदोलने, मोर्चे, तक्रारी यांसारखे इतर विषय प्रशासनाला कौशल्याने हाताळावे लागणार आहेत.
असे आहेत प्रशासक
यामध्ये बार्शी, पंढरपूर, करमाळा, कुर्डूवाडी, मैंदर्गी, मंगळवेढा नगरपरिषदेवर प्रशासक म्हणून उपविभागीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सांगोला नगरपरिषदेवर तहसीलदारांची प्रशासकपदी नियुक्ती झाली आहे. दुधणी व अक्कलकोट नगरपरिषदेचे प्रशासक म्हणून तेथील मुख्याधिकारी काम पाहतील असे नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी आदेशात म्हंटले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज