टीम मंगळवेढा टाईम्स ।
मुलाच्या जन्माबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने अडचणीत आलेल्या प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांच्यामागे लागलेले शुक्ल काष्ठ काही कमी होताना दिसत नाहीत. संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यालायाने इंदोरीकर महाराजांना दिलासा दिला होता.
मात्र या निकालाविरोधात अंधश्रद्धा निर्मुलन समितीपाठोपाठ सरकारी पक्षानेही मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केलीय. त्यामुळे इंदोरीकर महाराजांच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता आहे.
संगमनेर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने इंदोरीकर महाराजांच्या बाजूने निकाल देताना, त्यांच्याविरुध्दचा खटला रद्द केला होता. मात्र, या निर्णयाविरोधात महाराष्ट्र अंनिसने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली.
अंनिस पाठोपाठ सरकारी पक्षानेही संगमनेर न्यायालयाच्या निर्णयाला खंडपीठात आव्हान दिले आहे. सरकारी पक्षाने गुरुवारी याचिका दाखल केली.
नेमकं प्रकरण काय?
एका कीर्तनात बोलताना इंदोरीकर महाराजांनी “स्त्री संग सम तिथीला झाला, तर मुलगा होतो आणि विषम तिथीला झाला, तर मुलगी होते..” असं वादग्रस्त वक्तव्य केले होते.
लिंग भेदभाव करणारे हे वक्तव्य असल्याचा आक्षेप घेत, जिल्हा आरोग्य विभागाने इंदोरीकर महाराजांना ‘पीसीपीएनडीटी’ कायद्यानुसार नोटीस बजावून स्पष्टीकरण मागितले होते.
इंदोरीकर महाराजांचा हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली. काही सामाजिक संघटना आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीने इंदोरीकर महाराजांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.
मात्र, इंदोरीकर महाराजांनी हे वक्तव्य कुठे, कधी केले, याबाबत कुठलाही पुरावा नसल्याचे कारण देत अहमदनगर जिल्हा प्रशासनाने गुन्हा दाखल केला नाही.
दरम्यान, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या रंजना गवांदे यांनी याबाबत पाठपुरावा केला. या प्रकरणाचे पुरावे जिल्हा आरोग्य विभागाला दिले. त्यानंतर 26 जून 2020 रोजी संगमनेर कोर्टात जिल्हा आरोग्य प्रशासनाने इंदोरीकर महाराज यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.
संगमनेर कोर्टाने इंदोरीकर महाराज यांना समन्स बजावून कोर्टात हजर राहण्याचा आदेश दिले होते. मात्र, नंतर त्यांची या खटल्यातून निर्दोष मुक्तता केली होती.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज