टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघाच्या दिवंगत लोकप्रतिनिधीच्या कुटुंबात दिलेली उमेदवारी, भावनिक साद, तीन पक्षांची पाठीशी असलेली आघाडी. तर दुसरीकडे उमेदवाराची योग्य निवड, योग्य प्रचार, पक्ष संघटन आणि जनतेत असलेला सरकारविरोधी असंतोष
या साऱ्याचे प्रतिबिंब पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत दिसून आले. यामुळे भावनिकतेपेक्षा हा असंतोष निर्णायक ठरत येथे विजयाची माळ भाजपचे समाधान आवताडे यांच्या गळयात पडली.
दिगवंत आ.भारत भालके यांच्या अकाली निधनामुळे ही पोटनिवडणूक झाली. यामध्ये राष्ट्रवादीकडून भालके यांचा मुलगा भगीरथ भालके यांना उमेदवारी देण्यात आली. भालके हे श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष देखील आहेत.
मात्र त्यांचे नाव ठरवण्यापासून पक्षात सुप्त असंतोष दिसू लागला होता. हा असंतोष मिटवण्यासाठी या इच्छुकांची उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना अनेकदा समजूत काढावी लागली.
अखेर त्यावर मात करत ही निवडणूक आघाडीकडून भालके यांच्या निधनाने भावनिक मुद्यावर खेळवली गेली. आघाडीच्या सर्वच नेत्यांकडून या मुद्यावर भर देण्यात आला. दुसरीकडे भाजपाने ही निवडणूक गांभीर्याने घेत बेरजेचे राजकारण केले.
गेल्या दोन निवडणुका लढलेले परिचारक आणि समाधान अवताडे यांच्या गटांना एकत्र आणले गेले. गेल्या निवडणुकीत अवताडे आणि परिचारक यांच्या मतांची बेरीज जवळपास १,३०,००० इतकी झाली होती. त्यामुळे भाजपाने या दोघांना एकत्र करून अवताडे यांना उमेदवारी दिली.
यात प्रामुख्याने आ.परिचारक यांची पंढरपूर तालुक्यात, तर अवताडे यांची मंगळवेढा इथे असलेली शक्ती विचारात घेतली गेली. मतदारांसोबतच दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांंची फळीदेखील आवताडेंच्या कामी आली.
दरम्यान ही निवडणूक रंगात येत असतानाच कोरोनाचा कहर एकीकडे वाढत होता. या महामारीमुळे अगोदरच त्रस्त असलेली जनता ही सरकारच्या विरोधात गेलेली होती. वाढीव वीज देयके, वीज तोडणी, कर्जमाफी, अनुदान, मंत्र्यांचा भ्रष्टाचार या विविध मुद्यावर विरोधी पक्षाने तयार केलेल्या वातावरणात करोना काळात झालेली गैरव्यवस्थेची भर पडली.
पक्षांतर्गत गोंधळाबरोबरच हाही मुद्दा राष्ट्रवादीच्या विरोधात गेला, तर दुसरीकडे भाजप मात्र विविध गटातटांसह एकत्र आल्याने पंढरपूरमध्ये भाजपाचे कमळ उमलणे सोपे गेले. यामुळे पहिल्या फेरीपासून आघाडी घेतलेल्या समाधान अवताडे यांनी ३ हजार ७३३ मतांनी विजय संपादन केला.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर आघाडी विरोधात भाजप अशी प्रथमच लढत होत असल्याने दोन्हीकडील नेत्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. यामध्ये भाजपकडून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक नेत्यांनी,
तर आघाडीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह अनेक नेत्यांनी गेल्या काही दिवसांत मतदारसंघात तळ ठोकत प्रचाराची रणधुमाळी तप्त ठेवली होती. यामध्ये अखेर भाजपाने बाजी मारली.(मंदार लोहोकरे, लोकसत्ता)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज