टीम मंगळवेढा टाईम्स ।
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या संचारबंदी कायद्याचे पालन न करणाऱ्या पंढरपूर शहर व तालुक्यातील ५ हॉटेलवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या संचारबंदी कोरोना विषयक निर्बंधांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाने पोलिस कर्मचाऱ्यांची पथके तयार करण्यात आली आहेत.
रात्री आठच्या नंतर सुरू असलेल्या आस्थापना, हॉटेल, लॉज, बियर बार यांच्यावर अचानक धाड टाकण्याचे काम पथकामार्फत करण्यात येत आहे.या पथकाने पंढरपूर शहरातील सहारा परमिट रूम दोस्ती ढाबा, तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लक्ष्मी टाकळी बायपास रोडवरील मेजर कॉर्नर व ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वाखरी येथील गावरान तडका या हॉटेलमध्ये अचानक भेट दिली.
यावेळी सर्व ठिकाणी कोणत्याही प्रकारचे सोशल डिस्टन्सिंगचे पालन होताना दिसून आले नाही. त्या ठिकाणी स्क्रीनिंग मशीन व सॅनिटायझर उपलब्धही नव्हते.रात्री ८ नंतर फक्त होम पार्सल सेवा सुरू ठेवण्याचे आदेश असूनही या हॉटेलमध्ये ग्राहक दिसून आले.
संबंधित हॉटेलने ग्राहक धोरणविषयक नियम व आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग केल्याने दाखल करून हॉटेल सील करण्यात आले आहे. त्याचबरोबर त्यांना प्रत्येकी २ हजार रुपये दंड करण्यात आला आहे.
नियमांचे उल्लंघन केल्यामुळे मंगल कार्यालय सील
कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणारे मंगल कार्यालय विजापूर नाका पोलिसांनी सील केले आहे. मजरेवाडी येथील सहारा मल्टिपर्पज हॉल या मंगल कार्यालयावर दहा हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली असून हे मंगल कार्यालय पोलिसांनी सील केले आहे.
शहर व जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव अतिशय वेगाने वाढत असून महापालिकेच्या आयुक्तांनी मंगल कार्यालयाची तपासणी करून सदर मंगल कार्यालयामध्ये पन्नासपेक्षा जास्त व्यक्तींना सहभागी होता येणार नाही.
सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये जागामालकावर दंडात्मक कारवाई व गुन्हा दाखल करण्यात येईल.तसेच कोरोना आपत्ती संपुष्टात येईपर्यंत किंवा आयुक्त निश्चित करतील त्या मुदतीपर्यंत ज्या ठिकाणी असे लग्नसमारंभ आयोजित करण्यात येतील ती जागा सील करण्याचे आदेश देण्यात आले होते.
त्यानुसार या मंगल कार्यालयावर पोलिसांनी कारवाई केली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील,अजय जगताप व त्यांच्या पथकाने केली.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज