टीम मंगळवेढा टाईम्स ।
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाल्याने मतदारसंघातील राजकीय घडामोडींना आता कमालीचा वेग आला असून कोणाला उमेदवारी मिळणार आणि कोण आमदार होणार याची उत्सुकता वाढली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनामुळे ही पोटनिवडणूक होत आहे. आपली पकड मजबूत ठेवणारे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर पक्षांमध्ये आणि विठ्ठल परिवारामध्ये अंतर्गत कलह वाढला आहे.
काही पदाधिकाऱ्यांनी थेट भगीरथ भालके यांच्या उमेदवारीला विरोध केल्याने हा वाद मिटवण्यासाठी खुद्द राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे पंढरपूर दौऱ्यावर येत आहेत.
रविवार 21 मार्च रोजी सकाळी नऊ वाजता श्रेयस पॅलेस, कराड रोड पंढरपूर येथे कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली असल्याची माहिती पक्षाच्या वतीने देण्यात आली.
या पोटनिवडणुकीत आता राष्ट्रवादीकडून कुणाला तिकीट दिलं जाणार आणि भाजपकडून कोणता उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. गेल्या विधानसभा निवडणुकींनंतर राज्यातील राजकीय समीकरणे पूर्ण बदलली आहे.राज्यात आता महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले आहे. त्यामुळे या निवडणुकीला वेगळे महत्व आहे.
पंढरपूर तालुक्यातील राष्ट्रवादीत अंतर्गत गटबाजी उघड
आ.भारत भालके यांच्या निधनानंतर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची धुरा त्यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांच्या खांद्यावर आली. भगीरथ भालके चेअरमन झाल्याचे अनेक संचालकांच्या पचणी पडले नव्हते. त्यामुळे अंतर्गत खदखद सुरू होती. याची ठिणगी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजयसिंह देशमुख यांच्या निवडीवरून पडली.
युवराज पाटील यांनी बंडाचा झेंडा उभारला आणि थेट भगीरथ भालके यांच्या उमेदवारीला आव्हान दिले. याला विठ्ठलाच्या काही संचालकांची आतून फूस असल्याचे देखील बोलले जात आहे.
युवराज पाटील आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या बंडाची दखल थेट पक्षाने घेतली.पोटनिवडणुकीच्या तोंडावर अंतर्गत कलह वाढल्यास धोका होऊ शकतो. त्यामुळे भगीरथ भालके यांच्या जागी आमदार भारत भालके यांच्या सुविद्य पत्नी जयश्रीताई भालके यांना उमेदवारी देण्याबाबत देखील चर्चा सुरू झाली. तरीही खबरदारी म्हणून रविवारी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत. अंतर्गत वाद मिटवून त्यानंतरच उमेदवारीची घोषणा केली जाईल अशी माहिती सूत्रांनी दिली.
भालके कुटुंबाला डावलणे कठीण
एकंदरीतच पंढरपूर मंगळवेढा मतदार संघातील सर्व पदाधिकाऱ्यांची सविस्तर चर्चा अंतर्गत वाद मिटवणे आणि कार्यकर्त्यांना कामाला लावणे यासाठी हे दोन बडे नेते पंढरपूरात येत आहेत.
भारत भालके यांनी 2009 , 2014 आणि 2019 अशी सलग विजयाची हॅट्रिक साधली होती. प्रत्येक वेळेस त्यांनी एक हाती विजय खेचून आणला होता. आता मात्र अंतर्गत कलह वाढल्याने आणि सोलापूर जिल्ह्याला राष्ट्रवादीमध्ये खंबीर नेतृत्व नसल्याने थेट प्रदेश पातळीवरील नेत्यांना पोटनिवडणुकीमध्ये लक्ष घालावे लागत आहे.
आता उमेदवारी देताना राष्ट्रवादीच्या नेत्यांना भालके यांच्या प्रतिमेचा विचार करावाच लागणार आहे. भालके यांच्या जागेवर त्यांचे पुत्र भगीरथ भालके किंवा त्यांच्या पत्नी जयश्री भालके यांना राष्ट्रवादीवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता सध्या वर्तविली जात आहे.
भालके यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी त्यांच्या निवासस्थानी भेटी दिल्या. तेव्हा उपस्थित कार्यकर्त्यांनी भगिरथ भालके यांना उमेदवारी देण्याची आग्रही मागणी केली.
पक्ष निरीक्षकांनी घेतलेल्या बैठकीत देखील भगिरथ यांचेच एकमेव नाव पुढे आले. तथापी निवडणूकीसाठी इच्छुक असलेले डीव्हीपी उद्योग समूहाचे अभिजीत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत जाऊन श्री. पवार यांची भेट घेतली होती.
दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे यांनीही आपल्याला राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजपा या दोन्ही पक्षांकडून उमेदवारी देण्याविषयी विचारणा होत असल्याचे जाहीरपणे केले आहे.
परंतु कोणत्याही पक्षाने अजून उमेदवारीची घोषणा केलेली नाही. शिवसेनेच्या शैला गोडसे हे देखील निवडणूकीसाठी इच्छुक आहेत.
परिचारक गटाची भूमिका निर्णायक
राजकीय हालचालींना वेग आलेला असताना परिचारक गटाची भूमिका अजूनही गुलदस्त्यातच आहे. आमदार प्रशांत परिचारक यांची विधान परिषदेची मूदत आणखी साधारण एक वर्ष आहे. त्यामुळे युटोपियन शुगरचे अध्यक्ष उमेश परिचारक अथवा युवा नेते प्रणव परिचारक यांना रिंगणात उतरवावे, असा सूर कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे.
परंतु आमदार प्रशांत परिचारक यांनी अजून नेमकी भूमिका जाहीर केलेली नाही. त्यामुळे यावेळी परिचारक कुटुंबातील कोणीही निवडणूक लढवणार का भाजप जो उमेदवार देईल, त्याच्या पाठीशी राहण्याची भूमिका घेतली जाणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे. पोटनिवडणुकीत परिचारक गटाची भूमिका निर्णायक ठरणार आहे. पण परिचारक गट सध्या पोटनिवडणूक लढण्याच्या मन:स्थितीत नसल्याचं बोललं जात आहे.
भाजपाकडून आवताडे यांचे नाव आघाडीवर
भाजपाकडून कोणाला उमेदवारी द्यायची, या विषयी चाचपणी सुरु आहे. मात्र भाजपकडून संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष समाधान औताडे यांचे नाव सध्या तरी आघाडीवर आहे.
बांधकाम ठेकेदार म्हणून समाधान आवताडे हे देखील भाजपा नेत्यांच्या परिचयाचे आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसने उमेदवारी नाकारलेल्या किंवा आवताडे यांना भाजपकडून उमेदवारी देऊन राष्ट्रवादी कॉंग्रेसला शह दिला जाऊ शकतो.
राज्यातील बदललेल्या राजकीय परिस्थीतीमुळे या पोटनिवडणुकीला खास महत्व आहे. शिवाय या मतदारसंघात आता महाआघाडीमुळे शिवसेनेच्या अस्तिताचे काय होणार हाही प्रश्न आहे. तसेच विविध पक्षांतून अनेक मातब्बर इच्छुक असल्याने ही निवडणूक रंगतदार होणार हे मात्र नक्की.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज