टीम मंगळवेढा टाईम्स ।
महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींची मतमोजणी आज पार पडली असून तत्पूर्वी, सर्वच ग्रामपंचायतींचे सरपंच आरक्षण निश्चित झाले आहे. त्यानुसार 21 फेब्रुवारीपर्यंत तथा लवकरात लवकर सरपंच, उपसरपंच निवड होऊन पहिली ग्रामसभा घ्यावी, असे आदेश ग्राम विकास विभागाने दिले आहेत.
ज्या ग्रामपंचायतीत आरक्षित जागेवर सरपंचपदाचा उमेदवार न मिळाल्यास आरक्षण बदलण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. त्यांच्या निवडीही मुदतीत होणार आहेत.
मतमोजणीनंतर 21 जानेवारीला ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाणार आहे.त्यानंतर आरक्षण जाहीर करुन सरपंच निवडीसाठी सात दिवसांची नोटीस दिली जाणार आहे.
त्यानंतर एक दिवस निश्चित करुन त्याच दिवशी सरपंच निवडीच्या अनुषंगाने आरक्षणानुसार संबंधित उमेदवारांकडून अर्ज मागविले जातील. त्याच दिवशी अर्ज माघार व सरपंच निवड होईल, असा नियोजित कार्यक्रम ग्राम विकास विभागाने ठरविला आहे.
ग्राम विकास विभागाने 11 आणि 16 डिसेंबरला दोन स्वतंत्र पत्र काढली. 11 डिसेंबरच्या पत्रानुसार 15 जानेवारीपासून महिनाभरात सरपंच, उपसरपंच निवड आणि पहिली ग्रामसभा व्हावी, असे स्पष्ट करण्यात आले.
मात्र, पुन्हा त्यात बदल करुन ग्राम विकास विभागाने 16 डिसेंबरला नवे पत्र काढले. त्यानुसार 21 जानेवारीनंतर लवकरात लवकर आरक्षण जाहीर करावी आणि सरपंच, उपसरपंच निवड करावी किंवा 15 जानेवारीपासून 30 दिवसांत आरक्षण जाहीर करुन 30 दिवसांत सरपंच निवड आणि पहिली ग्रामसभा घ्यावी, असे स्पष्ट केले.
त्यानुसार आता कार्यवाही सुरु झाली असून काही ग्रामपंचायतींच्या सरपंच निवडी 31 जानेवारीपर्यंत होणार असून उर्वरित ग्रामपंचायतींचा कारभारी 21 फेब्रुवारीपर्यंत ठरणार आहेत. त्यादृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांनी सरंपच आरक्षण सोडत व निवडीचा कार्यक्रम तयार करण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान, या ग्रामपंचायत निवडणुकीत युवकांनीच बाजी मारली असून त्यात लॉकडाउन काळात गावी परतलेल्या युवकांचा सर्वाधिक समावेश आहे. तर महिला सदस्यांची संख्याही मोठी असल्याचे चित्र आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज