टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक 658 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाने सुरु केली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने सोलापूर जिल्ह्यातील चार ग्रामपंचायतीची निवडणूक तीन महिन्यासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतचे पत्र राज्य निवडणूक आयोगाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठविण्यात आले आहे.
माळशिरस तालुक्यातील अकलूज, नातेपुते, महाळुंग-श्रीपुर आणि बार्शी तालुक्यातील वैराग या ग्रामपंचायतींचा यामध्ये समावेश आहे. या चार ग्रामपंचायतींचे रूपांतर नगरपंचायत व नगर परिषदमध्ये केले जाणार आहे.
अकलूज या ठिकाणी नगरपरिषद तर नातेपुते, महाळुंग-श्रीपुर आणि वैराग या ठिकाणी नगरपंचायतीची स्थापना केली जाणार आहे.
अकलूज, नातेपुते, माळाळुंग-श्रीपुर या तिन्ही ग्रामपंचायतींचे रुपांतर नगरपंचायत व नगरपरिषदेत करण्यासाठी प्राथमिक अधिसूचना जाहीर करण्यात आली. या अधिसुचनेवर हरकती मागविण्यात आल्या व हरकती नंतरचा अंतिम अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने नगर विकास विभागाला पाठविण्यात आला आहे.
या तिन्ही ठिकाणी नगरपरिषद/नगरपंचायत अस्तित्वात आणण्यासाठी अंतिम अधिसूचना निघणे बाकी आहे.
बार्शी तालुक्यातील वैराग येथील ग्रामपंचायत बरखास्त करून त्याठिकाणी नगरपंचायत स्थापन करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाचा प्रस्ताव नगर विकास विभागाला गेला आहे. वैराग नगरपंचायतसाठी सुरवातीला प्राथमिक अधिसूचना जाहिर केली जाणार आहे. त्यानंतर नागरिकांच्या हरकती मागविल्या जाणार आहेत.
त्यानंतर अंतिम अधिसूचना जाहीर करून याठिकाणी नगरपंचायत अस्तित्वात येणार आहेत. या चार ठिकाणी नगरपंचायत व नगरपरिषद स्थापन करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, राज्य सरकार यांच्याकडून प्रक्रिया सुरू असतानाच राज्य निवडणूक आयोगाने या चारही ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता.
त्यामुळे या गावांच्या निवडणुकीबाबत सभ्रम निर्माण झाला होता. जिल्हाधिकारी कार्यालयाला आज मिळालेल्या पत्रामुळे हा संभ्रम आता दूर झाला आहे.(source:sakal)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज