टीम मंगळवेढा टाईम्स ।
आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनाने रिक्त जागी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीतून संचालक भगीरथ भालके यांच्या नावाला कार्यकर्त्यांचा दबाव वाढत असताना, विरोधी गटाच्या भूमिकेकडे राजकीय निरीक्षकांसह मतदारांचे लक्ष लागले आहे.
तालुक्याचे नेतृत्व करणाऱ्या पूर्वीच्या नेतेमंडळींनी राजकारण करताना शेतीच्या पाण्याचा व विकासाचा प्रश्न रखडत ठेवला. हेच प्रश्न हेरून आमदार भारत भालके यांनी 2007 पासून जनसंपर्क वाढवत शेतकऱ्यांच्या व सर्वसामान्यांच्या रखडलेल्या प्रश्नांसाठी शेतकऱ्याचा मुलगा विधानसभेत गेला पाहिजे,
या दृष्टीने तयारी केल्याने 2009 च्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते- पाटील यांचा पराभव केला व विधानसभेत पोचले.
मंगळवेढा तालुक्यातील अनेक प्रश्नांसाठी विधानसभेत आवाज उठवत अशक्य असणाऱ्या 530 कोटींच्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस मंजुरी मिळवली.
म्हैसाळ योजनेची रखडलेली कामे मार्गी लावली, शिरनांदगी तलावात पाणी सोडले, 40 गावांची भोसे प्रादेशिक योजना, प्रांत कार्यालय, विविध कार्यालयांना मंजुरी व उभारणीसाठी निधी, रस्ते, पूल, बंधारे, राज्यातील सर्वाधिक तीर्थक्षेत्र विकास निधी, बसवेश्वर स्मारक, चोखामेळा स्मारक उभारणी निधीसाठी पाठपुरावा, पीकविमा यासह अनेक विकासकामे त्यांनी मार्गी लावली.
विद्यमान सरकारकडून 35 गाव योजनेला निधीची देखील तरतूद करून घेत असताना त्यांचे अकाली निधन झाल्याने मतदारसंघातील त्यांच्या समर्थकांना मोठा धक्का बसला.
त्यांच्या निधनाने तालुक्याच्या विकासावर परिणाम होणार असल्याने त्यांच्या समर्थकांनी आपले दुःख बाजूला ठेवत सरकोलीतील भालके यांच्या निवासस्थानी जाऊन भगीरथ भालके यांची भेट घेतली व त्यांच्या निधनामुळे जी पोकळी निर्माण झाली आहे,
ती भरून काढावी, आमचे नेतृत्व स्वीकारत व कुटुंबकर्ता म्हणून पालकत्व स्वीकारावे, यासाठी आम्ही सर्वजण पाठीशी राहू, अशी भावना व्यक्त केली.
(कै.) आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग येऊ लागला आहे. स्व. भालके यांचे शरद पवार यांच्यावरील प्रेम पाहता त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी आमची असून, आम्ही योग्य वेळी न्याय देऊ, असे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सूचित केल्याने राष्ट्रवादीकडून भगीरथ भालके यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे.
परंतु या मतदारसंघात ही जागा भाजपकडे असून 2014 मध्ये भाजपने ही जागा स्वाभिमानीला देऊ केली तर 2019 ला रयत क्रांती पक्षाला देऊ केली. पण पोटनिवडणुकीत भाजपची भूमिका काय असणार, हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.
भाजपकडून या मतदारसंघाची जबाबदारी आमदार प्रशांत परिचारक यांच्यावर आहे तर आमदार प्रशांत परिचारक व दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे यांचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी घनिष्ठ संबंध असल्याने, या मतदारसंघाच्या भाजप उमेदवार व निवडणूक लढविण्याविषयी मात्र या दोघांची भूमिका विचारात घेतली जाणार आहे
तर या मतदारसंघात दोन वर्षांपूर्वी आमदारकीची संधी मिळावी म्हणून तत्कालीन मंत्री तानाजी सावंत यांच्या माध्यमातून शैला गोडसे यांनीसुद्धा प्रयत्न केले होते. परंतु शिवसेना-भाजप युती जागा भाजपकडे गेल्यामुळे त्यांना थांबावे लागले.
सध्या मात्र शिवसेना आणि भाजपची ताटातूट झाली आहे, त्यामुळे या पोटनिवडणुकीत या सर्व इच्छुकांची भूमिका मात्र निर्णायक ठरणार आहे. (सकाळ)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज